बुलढाणा: राग, अहंकाराच्या भरात माणूस काय करेल याचा नेम नसतो. याचे एक मासलेवाईक परंतु भयावह उदाहरण असलेली घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. ऐन दिवाळी सणाच्या धामधूमीत झालेल्या या घटनेने देऊळगाव राजा तालुकाच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे…
देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुई (जिल्हा वाशिम) येथील रहिवासी आणि पुण्यातील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या नराधमाने आपल्या दोन जुळ्या मुलींची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पिता पुत्रीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या या क्रूरकर्मा या पित्याचे नाव राहुल चव्हाण असे आहे. त्याने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून खून केल्याची घटना उघड झाली आहे.
या घटनेचा विस्तृत तपशील येथे प्राप्त झाला नाही. मात्र प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, राहुल चव्हाण हा आपल्या पत्नी आणि दोन मुलींना घेऊन घरी जात होता. प्रवासादरम्यान नवरा-बायकोमध्ये वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तर राहुल मुलींना घेऊन पुढे निघाला. रागाच्या भरात त्याने अंढेरा फाटा जवळील जंगलात आपल्या दोन मुलींचा गळा कापून निर्दयपणे खून केला. यानंतर, स्वतः राहुल याने वाशिम पोलीस ठाणे गाठून जाऊन आपल्या क्रूर कृत्याची कबूली दीली. पोलिसांनी तत्काळ अंढेरा फाटा परिसर गाठून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
घटनास्थळी डीवायएसपी मनिषा कदम, संतोष खराडे, ठाणेदार शक्करगे, पोलीस अधिकारी जारवार, फूसे, जाधव आदी दाखल झाले आहे. या घटनेमुळे अंढेरा परिसर, देऊळगाव राजा तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जनमाणसं सुन्न झाले आहे. परिसरातील नागरिक हादरले असून, दोन निष्पाप बालिकांचा जीव वादातून गेला हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
