बुलढाणा : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील फ़ोटो, व्हिडीओ सार्वत्रिक झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. रेणुका देविच्या पावन वास्तव्याने पुनीत चिखली नगरी देखील याला अपवाद ठरली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कुख्यात वाल्मिक कराड याच्या गुन्हेगारी वृत्ती आणि कुकृत्याचा जळजळीत निषेध करण्यात आला या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला फाशी देण्याची मागणी चिखली शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली.

चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज बुधवारी, ५ मार्च रोजी, वाल्मिक कराडच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारून व पुतळा जाळून जहाल निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना चिखली शहरप्रमुख विलास घोलप यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, माजी उप तालुका प्रमुख कपिल खेडेकर, युवासेना तालुका प्रमुख गोपी लहाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलकांनी वाल्मिक कराडला फाशी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करत निषेध नोंदवला. आंदोलनामध्ये रवी भगत, रामकृष्ण अंभोरे, विकी नकवाल, राहुल शेलकर, राका मेहेत्रे, पवन चिंचोले, गोपाल ठेंग, गजानन शेळके, अमर सुसर, दीपक रगड, शिवाजी शिराळे, बंडू नेमाने, अमर काळे, नारायण गरड, गणेश वाघमारे सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करत, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे.

निर्दयी गुन्हेगाराला फाशीच दया : ओमसिंग राजपूत

शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांनी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “संतोष देशमुख यांची हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशा क्रूर हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे. राज्य शासन आणि सर्व यंत्रणानी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणीही राजपूत यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana shiv sena shinde group agitation on walmik karad issue scm 61 asj