चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात वाघाच्या हल्ल्यात अल्का पांडुरंग पेंदोर (४५) या महिला शेतकऱ्याचा मृत्य झाला. या घटनेमुळे गावात भिती व दहशतीचे वातावरण आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या अल्का पेंदोर या उशिरापर्यत घरी पोहचल्या नाही. त्यामुळे सायंकाळी गावकऱ्यांनी शेतशिवार गाठले असता शेतात मृतदेह आढळून आला. रविवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. गेल्या आठ दिवसात वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याची ही तिसरी घटना आहे.

गेल्या काही दिवसापासून गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव, वटराणा, गणेशपिपरी,चेकपिपरी व परिसरात वाघाची दहशत सुरू होती. या वाघाने अनेक बैलांची शिकार केली. वनविभागाने उपाययोजना करित नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, आठ दिवसांआधी चेकपिपरी येथील भाउजी पाल या शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला. त्यानंतर नागभीड येथे शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दहशत व भीती पसरली. गोंडपिपरी नगरात वाघ आल्याच्या घटनांनी अनेकांना भयभीत करून सोडले. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने गस्त वाढविली.

रविवारी गणेशपिपरी येथील अल्का महादेव पेंदोर शेतात गेल्या होत्या. वाघाच्या दहशतीमुळे गावात मजुर मिळत नसल्याने अल्का या एकटयाच शेतात गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यत त्या घरी पोहचल्या नाहीत. गावात आधीच वाघाची दहशत असल्याने कुटुंबीयांना शंका आली. गावातील नागरिकांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. यावेळी अल्का यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान वनविभागाची चमूही घटनास्थळी दाखल झाली. यावेळी संतापलेल्या गावकऱ्यांनी जोपर्यत वाघाला जेरबंद करत नाही व सन्मानजनक मदत दिल्या जात नाही तोपर्यत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली. उशिरापर्यत हा प्रकार सुरू होता.

वाघाच्या हल्ल्यात दोन शेतक-यांचे नाहक बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी आता समोर येत आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी या वाघाला तातडीने जेरबंद करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संवाद साधला. या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश जारी केले आहे. पण वनविभागाला अद्याप या वाघाला जेरबंद करण्यात अपयश आले आहे.