नागपूर : जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा शहरात रविवारी(१५ जून) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली़ या घटनेने खापा शहर हादरले असून आठ वर्ष जुन्या वादातून आरोपीने फिल्मीस्टाइल पाठलाग करून हा गोळीबार केला आहे़
मृतक तरुणाचे नाव चेतन अशोक गागटे (३१, रा. हनुमान घाट, खापा) तर गोळीबार करणाºया आरोपीचे नाव अर्जुन शेषराव निळे (३४, रा. डोंगेघाट, खापा), असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक चेतन गागटे खापा शहरातील गांधी पुतळ्याजवळील एका पान स्टॉलवर बसला होता. त्यादरम्यान, दुचाकीवरून आलेल्या आरोपी अर्जुन निळेने त्याला बघितले. आरोपी अर्जुन लगेच आपल्या दुचाकीवरून उतरला आणि त्याने चेतनचा पाठलाग सुरू केला.
त्यावेळी आरोपीने गांधी पुतळ्याजवळ पहिली गोळी झाडली़ मात्र ती चुकली. त्यानंतरही चेतनचा पाठलाग सुरूच होता़ आरोपीने बोंद्रे येथील सरकारी धान्य दुकानाजवळ दुसरी गोळी झाडली़ ती सुद्धा चुकली. आपला जीव वाचविण्यासाठी मृतक चेतन एका अरुंद गल्लीत पळाला़ जिथे तो अडखळला व खाली पडला. याच संधीचा फायदा घेत आरोपी अर्जुनने चेतनवर तिसरी गोळी झाडली़ ती थेट छातीत आरपार शिरल्याने तो गंभीर जखमी झाला.
आरोपी तिथेच थांबला नाही़ त्याने चौथी गोळी चालविण्याचा प्रयत्न केला़ पण ट्रिगर अडखळले. गोळीबारानंतर जखमी चेतनला त्याच्या भावाने तत्काळ वाहनातून नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आला़ गोळीबार केल्यानंतर आरोपी अर्जुन तेथून थेट खापा पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी खापा पोलिसांनी आरोपी अर्जुनला अटक केली असून घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांनी भेट दिली़ जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वात खापा पोलीस पुढील तपास करत आहेत.