गडचिरोली : गेल्या आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तीन राष्ट्रीय महामार्गासह ४१ मार्ग बंद झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील भामरागड तालुक्यासह जवळपास २०० गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयापासून तुटलेला आहे. परिणामी आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय झाले असून दोन दिवसात शंभरहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा २१५ टक्के अधिक पाऊस पडल्याने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. जिल्ह्यातील वैनगंगा, इंद्रावती, वर्धा या या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून तीन राष्ट्रीय महामार्गासह ४१ मार्ग बंद झाले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प पडली आहे. यामध्ये आलापल्ली ते सिरोंचा, आलापल्ली-भामरागड, सिरोंचा-जाफ्राबादा या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यामुळे परिस्थिती पूर्व पदावर येत होती. मात्र, गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने पुन्हा एकदा पूर संकट ओढवले आहे. अजूनही २०० हून अधिक गावांचा मुख्यालयापासून संपर्क तुटलेला आहे. या पूरस्थितीवर जिल्हा व पोलीस प्रशासनाचे संपूर्ण लक्ष असून यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. सोबतच अतिसंवेदनशील भागात ‘एसडीआरएफ’ची चमूदेखील तैनात करण्यात आली आहे.

हेही वाचा : नागपुरात हे काय सुरू आहे! आणखी एका प्रेमी युगुलाचे रस्त्यावर अश्लील चाळे

दुसरीकडे, गोसेखुर्दमधून ३.०३ लाख क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने पुढील दोन दिवस नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर तेलंगणातील श्रीपदा येल्लमपल्ली या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यास सिरोंचा तालुक्यातील पूरस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून तेलंगणा प्रशासनासोबत सतत संवाद करण्यात येत असून पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहे.

हेही वाचा : नवनीत राणा म्‍हणतात, “मी माझ्या परीक्षेत नापास, पण…”

पोलीस भरती लेखी परीक्षेला ९९ टक्के उपस्थिती

जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे रविवारी २८ जुलै रोजी पार पडलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी पोहोचण्याचे उमेदवारापुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच ‘एसडीआरएफ’च्या मदतीने २३ उमेदवारांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले. सोबतच पोलीस प्रशासनाने देखील परीक्षार्थींना वेळेत पोहोचण्यासाठी मदतीचा हात दिला. त्यामुळे आज पोलीस भरती लेखी परीक्षेला ९९ टक्के उपस्थिती होती. ‘एसडीआरएफ’ने दोन दिवसात शंभरहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli flood like situation as 41 routes including 3 national highways closed ssp 89 css