गडचिरोली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून १४ जानेवारी रोजी राज्यभरात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठीचा संकल्प या मेळाव्यातून करण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेतून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर महायुतीतील १२ घटक पक्ष एकत्र येत राज्यभरात जिल्हास्तरावर १४ जानेवारी रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. यामाध्यमातून महायुतीतील एकजुटतेचे प्रदर्शन करून ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.

हेही वाचा : वाशीम : विकसित भारत संकल्प यात्रेला संमिश्र प्रतिसाद!

यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना, आरपीआय(आठवले आणि कावाडे गट) आणि इतर घटकपक्ष सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी आणि एकाच दिवशी हा महामेळावा आयोजित करून नवा विक्रम प्रस्थापित करणार असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. पत्रपरिषदेला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेनेचे हेमंत जंबेवार, प्रमोद पिपरे तसेच घटक पक्षातील इतर नेते उपस्थित होते.

हेही वाचा : हेल्मेट न वापरल्यामुळे १२० दुचाकी चालकांचा मृत्यू, अकोल्यात तीन वर्षांत ४९६ जणांचा अपघातात बळी

लोकसभेवर दावेदारीबाबत बोलण्यास नकार

काही दिवसांपूर्वी गडचिरोली-चिमूर लोकसभेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दावा केला होता. स्थानिक अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी वेळोवेळी लोकसभा लढविण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी महायुतीत अंतर्गत संघर्ष लपलेला नाही. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांना प्रश्न केला असता त्यांनी यावर सावध पवित्रा घेत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli mahayuti melava on 14 january aim to elect more than 45 mp in maharashtra ssp 89 css