नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्यास ट्रकसह पकडले. ही कारवाई बोरखेडी टोलनाक्यावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. झडतीत ट्रकमधून एक कोटी ९५ लाख १० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. शंकर (४५) रा. विशाखापट्टनम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. विशेष म्हणजे डीआरआयच्या पथकाने २०१९ मध्ये गांजाची सर्वात मोठी कारवाई केली होती. दिवाळी दरम्यान बोरखेडी परिसरात सापळा रचून २ हजार ८० किलो गांजा जप्त केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओडिशा आणि आंध्र प्रदेशात गांजाची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. याच राज्यांतून देशभरात गांजाचा पुरवठा केला जातो. रेल्वे आणि रस्ते मार्गाने गांजाची वाहतूक केली जाते. गांजा पोहोचविणाऱ्याला एका खेपेची मोठी रक्कम मिळते. महिला, विद्यार्थी आणि अल्पवयीन मुलांचा यासाठी वापर केला जातो. एका शहरातून दुसऱ्या शहरात गांजा पोहोचविने एवढेच त्यांचे काम असते. त्यामुळे म्होरक्या पोलिसांच्या जाळ्यात अडकत नाही आणि गांजाची तस्करी अशीच सुरू असते. तस्करी करणाऱ्या शंकरने आंध्र प्रदेशातून एका ट्रकमध्ये गांजा भरला. पॉलिथिनच्या पॅकेटमध्ये गांजा ठेवला, टेपपट्टीने चिटकवून पॅकेट बंद केले. असे अनेक पॅकेट ट्रकमध्ये भरले. संशय येऊ नये म्हणून त्यावर शेणखताचे पोते ठेवले आणि उत्तरप्रदेशात माल पोहचविण्यासाठी निघाला. तस्करांना जाण्यासाठी बोरखेडी हा एकमेव मार्ग आहे. मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली. पथकातील सहा सदस्य पहाटेपासून बोरखेडी परिसरात सापळा रचून होते.

हेही वाचा : नागपूर : पगार रखडल्याने पोलीस कर्मचारी उसनवारीवर

पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास ट्रक टोलनाक्यावर येताच पथकाने ट्रक चालक शंकरला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. मात्र, तो उडावा-उडवीची उत्तरे देत होता. पथकाने ट्रकची झडती घेतली असता त्यात शेणखताचे पोते दिसले. पोते उचलून पाहिले असता गांजाचे पॅकेट मिळून आले. पथकाने शंकरला ताब्यात घेतले. रितसर गुन्ह्याची नोंद करून न्यायालयात हजर केले. न्यायालयात त्याची कारागृहात रवानगी केली. संपूर्ण अंमली पदार्थ अबकारी विभागाच्या गोदामात जप्त ठेवण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur ganja smuggler arrested ganja of rupees 2 crores seized by dri at borkhedi toll plaza adk 83 css