नागपूर : केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आयुध निर्माणी कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना अडकवणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. या टोळीने तीन युवकांची परीक्षाही घेतली, वैद्यकीय तपासणी केली आणि नियुक्तीपत्रही दिली. मात्र, रुजू होण्यासाठी गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

राजीव रेड्डी रा. मानकापूर, मिर्झा वसीम बेग रा. यवतमाळ, सूरज घोरपडे, सोनाली घोरपडे रा. देवळी, वर्धा, शैलेश गोल्हे रा. मानेवाडा, ज्ञानेश्वर सिर्सीकर, रोशन अड्याळकर आणि नीतेश कोठारी अशी आरोपींची नावे आहेत. राजीव रेड्डी फसवणूक प्रकरणातील म्होरक्या आहे. त्याने स्वत:ची टोळी बनविली. एक जण ग्राहक आणतो. दुसरा नोकरीचे प्रमाणपत्र दाखवून हमी देतो. तिसरा परीक्षा घेतो. चौथा वैद्यकीय तपासणी करून घेतो अशा पद्धतीने टोळीतील सदस्य काम करतात. या माध्यमातून आरोपींनी अनेक सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे.

हेही वाचा : राज्यातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचे शास्त्रज्ञ म्हणतात…

समताबाग, हिंगणघाट येथील रहिवासी फिर्यादी मंगेश चावरे हा सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याचा मित्र शैलेश गोल्हे हा कामाच्या शोधात नागपुरात आला. त्याची बहीण सोनाली विवाहित असून नागपुरात राहते. शैलेशने मंगेशला सांगितले की, त्याचा जावाई सूरज घोरपडे याला अलीकडेच आयुध निर्माणी कंपनीत नोकरी लागली. राजीव नावाचा व्यक्ती नोकरी लावून देतो. शैलेशने त्याच्या जावयाचे नियुक्तिपत्र आणि ओळखपत्रदेखील दाखविले. त्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला.

हेही वाचा :बाबो! पतीची ऑनलाईन हेरगिरी करण्यात भारतीय महिला तिसऱ्या स्थानी; जाणून घ्या सविस्तर…

मंगेश जाळ्यात अडकल्याचे पाहून त्याला नागपुरात बोलावण्यात आले. धरमपेठ येथील सौंदर्य इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस या कार्यालयात नेण्यात आले. तेथे आरोपी राजीवसोबत त्याची भेट करून देण्यात आली. राजीवने मंगेशला नोकरी लावून देण्याची हमी दिली. त्यासाठी तयार होताच ९ लाख रुपयांत सौदा पक्का झाला. दोन टप्प्यात म्हणजे आधी साडेचार, तर नोकरी लागल्यानंतर साडेचार लाख रुपये असे एकूण ९ लाख रुपये द्यायचे होते. मंगेशने स्वत:चा भूखंड विकून साडेचार लाख रुपये दिले. त्याच्यासोबतच गावातील इतर चार लोकांनाही जाळ्यात ओढण्यात आले. त्यांनीही नोकरीसाठी रोख रक्कम दिली. नोकरी मिळाली नाही तसेच पैसेही मिळत नसल्याने मंगेशने सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून ठाणेदार आसाराम चोरमले यांना सारा प्रकार सांगितला. तक्रारीवरून पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.

हेही वाचा : “…तर एका मिनिटात राजीनामा देणार’’, जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेने भाजपमध्ये भूकंप; १४ जूनकडे लक्ष…

असा झाला उलगडा

बेरोजगार युवकांची धरमपेठ येथे परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. बराच कालावधी लोटल्यानंतरही नोकरीचा थांगपत्ता नव्हता. दरम्यान फिर्यादीने गोपनीय माहिती मिळविली असता शैलेशचा जावई सूरज हा घरीच राहत असून, त्याला कुठलाच कामधंदा नसल्याचे समजले, तसेच सोनाली, शैलेश आणि सूरजच्या बँक खात्यांत लाखो रुपये असल्याचे समजल्यानंतर मंगेशला शंका आली. नंतर सर्वांनीच पैसे परत मागितले. शैलेशने त्याच्या दोन नातेवाईकांचे पैसे परत केले. मात्र, मंगेश आणि अन्य दोघांची रक्कम परत केली नाही.