लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून याचा फटका नियम पाळून वाहने चालवणारे व पादचाऱ्यांना बसत आहे. दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत असून रस्तेही गुळगुळीत झाले आहेत. यामुळे सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी पोलिसांची असूनही त्यांचे चिरीमिरी घेण्याकडेच जास्त लक्ष असते. पूर्वी वाहतूक पोलिसांचा वचक होता. पोलीस चौकात दिसल्यावर कुणीही सिग्नल तोडण्याची किंवा ‘ट्रिपल सीट’ जाण्याचे धाडस करीत नव्हते. परंतु, आता वचक उरलेला दिसत नाही.

शहरात ऑटोचालकांची दादागिरी सुरू आहे. ते नियम पाळत नाहीत. सिग्नल लाल असताना थांबत नाहीत. त्यांच्या मनमानीमुळे प्रवासी त्रस्त आहेत.
नागपुरातील कोणत्याही चौकातून विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाक्या आणि ऑटोचालक हे नेहमीचे चित्र झाले आहे. नियम मोडणाऱ्यांमध्ये महिला, विद्यार्थी, तरुणीही आघाडीवर आहेत. अनेकदा तरुण दुचाकीवर तिघांना बसवून पोलिसांच्या देखत धूम ठोकतात.

हेही वाचा… अकोला: धक्कादायक! ‘क्राईम शो’चा दुष्परिणाम; किरकोळ वादातून माहेरी आलेल्या मोठ्या बहिणीवर लहान बहिणीचे चाकूने सपासप वार

रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी पोलिसांनी खाजगी यंत्रणा नेमली आहे. पण ती बड्या हॉटेल्सपुढील वाहने का उचलत नाही, हा नागपूरकरांना पडलेला प्रश्न आहे. शहरात वाहनतळाचा प्रश्न गंभीर आहे. आराखड्यात त्यासाठी जागा सोडणाऱ्या पण प्रत्यक्षात त्यावर बांधकाम करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करायला हवी, पण तसे होत नाही. नागरिकांनी रस्त्यावर वाहने ठेवली तर त्यांच्यावर दंड आकारला जातो. पोलीस, महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास या सर्वांचे साटेलोटे नागपूरची वाहतूक व्यवस्था बिघडवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. सीटबेल्ट न लावता कार चालवणारे आणि विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कारवाईचा धाक दाखवून लूट

चालान करण्याची धमकी देऊन दंडाच्या नावाखाली पैसे उकळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अजनी, इंदोरा, सक्करदरा, एमआयडीसी या शाखेतील वाहतूक कर्मचाऱ्यांच्या लाच घेतानाच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतरही असे प्रकार थांबले नाहीत. बदली टाळण्यासाठी काही वाहतूक पोलिसांनी कागदपत्रात खाडाखोड केल्याचेही उघड झाले आहे. वाहतूक शाखेत सध्या बेबंदशाही सुरू असल्याचे चित्र आहे.

“वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. ‘ट्रिपल सीट’ आणि सिग्नल न पाळणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. ऑटोचालकांची मनमानी थांबवण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून लवकरच मोहीम राबवण्यात येणार आहे.” – विनोद चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सीताबर्डी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur law abiding people suffer due to traffic jams due to unruly traffic adk 83 dvr