नागपूर: शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्‍के जागांवर प्रवेशाची प्रक्रिया बारगळली आहे. यासंदर्भात न्‍यायालयात याचिका दाखल असल्‍याने सोडत जाहीर करूनही शिक्षण विभागाने तपशील जाहीर केलेला नाही. न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार सोडत जाहीर करणार असल्‍याची भूमिका शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. त्‍यामुळे सध्या तरी ‘न्‍यायालयात याचिका, अन्‌ रखडली प्रवेश प्रक्रिया’ अशी या योजनेची स्‍थिती आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेशाची यादी १३ जून रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र, आरटीईचे संकेतस्थळच खुले होत नसल्याच्या तक्रारींमुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. त्यावर तांत्रिक कारणांमुळे यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रियाच सुरू झाले नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. परिणामी आरटीईअंतर्गत प्रवेशाची यादी लांबणीवर पडली आहे.

हेही वाचा : पुणे अपघाताची नागपुरात पुनरावृत्ती…..अल्पवयीन कारचालकाने सहा जणांना चिरडले….

आता पालकांना आणखी चार-पाच दिवस वाट पहावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळा सुरु होण्याचे दिवस जवळ आले असताना ही आमच्या मुलांचे प्रवेश कधी होणार असा सवाल पालकांनी केला आहे. शिक्षण विभागाने आरटीई प्रक्रियेत केलेला बदल, त्याला न्यायालयाने दिलेली स्थगिती, त्यानंतरच जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय, या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काही पालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. गोंधळाच्या परिस्थितीने अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश अन्य शाळेत घेतले. परिणामी यंदा विद्यार्थ्यांच्या अर्जांच्या संख्येत घट झाली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात यंदा ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार ३९९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी अर्ज करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ३१ मे पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर २ लाख ४३ हजार १९ अर्ज दाखल झाले असून त्यासंदर्भाने प्रवेशाची सोडत ७ जून रोजी निश्चित करण्यात आली होती. परंतु प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने प्रवेशाची यादी १३ जूननंतर प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, १३ जून रोजी संकेतस्थळच खुले होत नसल्याचे पाहून पालकांमध्ये पुन्हा खळबळ निर्माण झाली. या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी अजून पुढील सूचना आल्या नसल्याचे सांगितले तर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सूरज मांढरे हे विदेशात प्रशिक्षणासाठी गेल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा : मस्तवाल वाळू तस्करांचा तलाठी, कोतवालावर हल्ला….चित्रफितीत जे दिसतेय….

तर एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने तांत्रिक कारणास्तव यादी प्रसिद्ध होऊ शकली नाही, असे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांनी सांगितले की, अद्याप विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचे कामच सुरू झालेले नाही. त्याला काही तांत्रिक कारणे आहेत. असे सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटीई प्रवेशासाठी ५७४ शाळा असून प्रवेश क्षमता ४,४५१ आहे. यासाठी १९ हजार २१७ अर्ज आले आहेत.