नागपूर: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून नागपूर दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या पत्रकारांशी संवाद साधला. नागपूरमध्ये असल्याने त्यांनी भाजप नेत्यांना खडे बोल सुनावले. नाव न घेता त्यांना व अनिल देशमुख यांना कारागृहात पाठवण्यासाठी नागपूर कसे जबाबदार आहेत हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

ते म्हणाले, मी आणि अनिल देशमुख एकाच वेळी कारागृहात होतो. ही वेळ भाजपच्या नागपूरच्या नेत्यांमुळेच आमच्यावर आली. देशमुख माझे मित्र आहेत. आम्ही ज्या कठीण परिस्थितीत व अवस्थेत त्याकाळात दिवस काढले ते फार भयानक होते. आम्ही परस्परांचा आधार होतो. आम्ही इतके दिवस कारागृहात काढले त्यामागे ‘नागपूर ‘चे षडयंत्र आहे, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा : चिखलदरा सफर… आता साहसी खेळाच्‍या सान्निध्‍यात…

विदर्भात ५५ जागा जिंकू

विदर्भातील ६२ पैकी ५५ जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. विदर्भातील चित्र महाविकास आघाडीला अनुकूल आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची नुकतीच मुंबईत बैठक पार पडली. त्यात सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी सहमतीने जागा वाटप करण्यावर सहमती दर्शवली. त्यामुळे वाद होणार नाही, असे राऊत म्हणाले .

शिवसेना नेते खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील त्यांनी संघटनात्मक आढावा घेतला. यासोबतच विदर्भातील विविध मतदार संघातील बैठक घेतली. महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या वतीने आयोजित महारोजगार मेळाव्यासाठी ते आले आहेत. या सोबतच विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.

हेही वाचा : अकोला : लाडकी बहीण योजना; बँक खाते ‘आधार सिडिंग’ आहे का? योजनेच्या लाभासाठी…

निवडणुकीला भाजप का घाबरते?

महाराष्ट्रातील जनतेला निवडणुका हव्या आहेत. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर, हरियाणासोबत महाराष्ट्रातील निवडणुकीची घोषणा करणे टाळले. भाजप निवडणुकीला का घाबरते? असा सवाल देशमुख यांनी केला. नागपूर ग्रामीणमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघ व रामटेक विधानसभा मतदारसंघ हे एकत्रित शिवसेनेचे बालेकिल्ले होते. शिवसेनेत फूट पडल्यावर रामटेक लोकसभेची जागा शिवसेनेने काँग्रेसला सोडली होती व सर्व शक्ती काँग्रेसच्या बाजूने उभी केली होती. त्यामुळे ही जागा जिंकताना काँग्रेसला मदत झाली. रामटेक विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. ही जागा काँग्रेस लढणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. हिंगणा मतदारसंघात हीच गोष्ट आहे. संजय राऊत यांच्या दौऱ्यात याच मुद्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढणार असे काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. दक्षिण आणि पूर्व अशा दोन जागा शिवसेनेने शहरात मागितल्या आहेत.