नागपूर : ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपूरसह वर्धा जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्यात महावितरणच्या कामगार वसाहतीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडेच हे मीटर्स लावले जात आहे. सुमारे ४० मीटर्स येथे लागले आहे. स्मार्ट मीटर्स, गेट-वे, डाटा सेंटर यातील माहिती आदान- प्रदान करण्याच्या प्रक्रीयेची चाचणी झाल्यानंतर हे मीटर्स शहरासह संपुर्ण नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे बसविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांच्या वीजग्राहकांकडे स्मार्ट प्रिपेड मीटर लावणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्यातील २.४१ कोटी ग्राहकांकडे हे मीटर लागणार आहे. मात्र, या मीटर्समधून कृषिपंपांच्या वीजजोडण्यांना वगळण्यात आले आहे.

विजेच्या व नवीन वीजजोडण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी तसेच वितरण यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचे व विजेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा ग्राहकांना अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर मोफत लावण्यात येत आहे. नादुरुस्त झाल्यास ते मोफत बदलून देण्यात येणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांवर स्मार्ट मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड पडणार नाही. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून निश्चित करण्यात आलेले वीजदर स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी लागू राहतील. विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून ग्राहकाला वीज वापरता येईल. त्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचत करता येईल. स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार वीजवापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे. स्मार्ट मीटरचे रिचार्ज करण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय राहिल. ग्रामीण व शहरी भागात सध्याच्या वीजबिल भरणा केंद्रातही हे रिचार्ज उपलब्ध राहिल.

हेही वाचा: ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प: पैसे भरा आणि मगच मचाणवर बसा, पण जेवण मिळणार नाही !

स्मार्ट मीटरच्या विजेचा जमाखर्च हा प्रत्येक वीजग्राहकांसाठी मोबाईल ॲपद्वारे दैनंदिन स्वरुपात उपलब्ध राहील. रिचार्ज केल्यानंतर किंवा रिचार्जची रक्कम संपण्यापूर्वी मोबाईल ॲपवर आणि नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे सूचनाही ग्राहकाला मिळेल, असेही महावितच्या नागपुरातील उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांचे म्हणने आहे.

सुट्टीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित नाही

स्मार्ट मीटरमधील रिचार्ज संपल्यानंतरही रात्री सहा ते सकाळी १० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होणार नाही. रिचार्ज संपल्यानंतर सार्वजनिक सुटीच्या दिवशीही वीजपुरवठा खंडित होणार नाही. यावेळी वापरलेल्या विजेचे पैसे रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांच्या रिचार्जमधून कपात होणार आहे.

हेही वाचा: शासनाच्या डोळ्यात धुळफेक! शेती नसलेल्यांनाही मिळाले धानाच्या बोनसचे पैसे; ६ लाख रुपयांचा घोटाळा

ग्राहकांना फायदा…

स्मार्ट मीटरमुळे सध्याच्या पारंपरिक मीटरचे रीडिंग घेणे, वीजबिल तयार करणे व वीजबिल वितरीत करणे बंद होणार. त्यामुळे मोबाईलसारखे रिचार्ज करा व आवश्यकतेनुसार वीज वापरा हा एकच बिलिंगचा विषय राहणार आहे. मानवी हस्तक्षेपामुळे सध्याच्या मीटरचे रीडिंग चुकीचे येणे किंवा सरासरी किंवा चुकीचे वीजबिल येणे, बील दुरुस्तीसाठी कार्यालयात जावे लागणे आदी ग्राहकांच्या मनस्तापाचे प्रकार नव्या तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे संपूर्णतः बंद होतील. स्मार्ट मीटरचे मासिक बिल वेबसाईट व मोबाईल ॲपवर उपलब्ध राहील. त्याची आवश्यकतेनुसार ग्राहकांना प्रिंट काढता येईल, अशी माहिती महावितरणचे नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले.