वाशीम : सध्या सर्वच पक्षाकडून लोकसभेतील उमेदवाराचा प्रचार सुरु आहे. निवडणूक आयोगाने प्रचार प्रसार करताना काटेकोर नियम घालून दिले आहेत. मात्र, एसटी महामंडळ अंतर्गत धावणाऱ्या बसेसवर चक्क महायुतीच्या जाहिराती झळकत आहेत. याबाबत वंचितचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करून निवडणूक आयोगाला प्रश्न केला आहे.

वाशीममध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर महायुतीच्या प्रचाराचे बॅनर लावण्यात आल्याने प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक विभागाच्या भुमीकेवर प्रश्न उपस्थित करीत राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसवर प्रचार करण्याची परवानगी कशी दिली जाते, असा मुद्दा ट्विटरवर पोस्ट करून उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लालपरी पोचत असल्याने महायुतीकडून सत्तेचा गैरवापर करीत शासकीय वाहनांचा वापर प्रचारासाठी केला जात आहे. निवडणूक विभागाच्या ही बाब निदर्शनास येऊ नये, याबद्दल सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “…तर सांगलीसाठी काँग्रेसचा एबी फॉर्म तयार”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती

परवानगी घेऊनच जाहिराती

राज्यात धावणाऱ्या बसेस वर महायुतीच्या जाहिराती लावलेल्या आहेत. मात्र, याबाबत वरिष्ठ स्तरावरून रितसर परवानगी घेतली असल्याची चर्चा आहे. याबद्दल एसटीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी याबद्दल काही बोलण्यास नकार दिला.