यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा नेतृत्व केल्यानंतरही शिवसेनेच्या शिंदे गटाने उमेदवारी नाकारल्याने विद्यमान खासदार भावना गवळी प्रचंड नाराज आहेत. त्या कोणालाही भेटल्या नाहीत. मात्र दोन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गवळी यांच्याशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळविल्याची चर्चा महायुतीच्या गोटात आहे.

दोन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे भावना गवळींची भेट घेऊन त्यांना पक्षासाठी सक्रिय होण्याची विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संवाद साधून भावना गवळींना सक्रिय होण्याच्या सूचना केल्यानंतर गवळी लवकरच महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारात सक्रिय होणार असल्याची चर्चा दोन्ही जिल्ह्यात रंगली आहे. यवतमाळ-वाशीमची उमेदवारी भावना गवळी यांना देवू नये म्हणून भाजपने कथित सर्वेच्या अहवालांचा हवाला देत मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्राचा वापर केला. या दबावाला बळी पडल्याने भावना गवळींऐवजी राजश्री हेमंत पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीची उमेदवारी देण्यात आली. मात्र पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून भावना गवळींनी नाराजीचा सूर आवळला. घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मुंबईहून त्या थेट आपल्या गावी रिसोड येथे पोहोचल्या. त्यांनी पक्षाच्या निर्णयाविरूद्ध कोणतेही बंड केले नाही. मात्र त्या सर्व राजकीय घडामोडींपासून अलिप्त झाल्या. त्यांच्या समर्थकांनीही ताईंच्या अलिप्ततेचा योग्य संदेश घेऊन महायुतीच्या उमेदवाराचे काम बंद केले.

हेही वाचा : यवतमाळ : अभयारण्यात वाघासोबत सेल्फी घेणे पडले महागात; वनक्षेत्र अधिकारी…

संघटनात्मक पातळीवर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर गवळी समर्थकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न शिवसेनेत सुरू झाले. मात्र भावना गवळी सक्रिय होईपर्यंत आम्ही काहीच निर्णय घेणार नाही, अशी भूमिका समर्थकांनी घेतली. अखेर उदय सामंत व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी रिसोड येथे भावना गवळींची भेट घेऊन त्यांची समजूत घातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत त्यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे स्पष्ट केले. महायुतीसाठी एकेक जागा किती महत्वाची आहे, हे पटवून देत गवळींना पक्षासाठी सक्रिय होण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येते.

सामंत यांच्या शिष्टाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भावना गवळींशी संपर्क साधून चर्चा केली. त्यामुळे भावना गवळी लवकरच महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मतदारसंघात फिरणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येत आहे. याबाबत भावना गवळी यांचे मत जाणून घेण्यासाठी वारंवार सपंर्क केला असता, त्या संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचा संदेश मिळाला. शिवसेनेच्या नेत्यांना भावना गवळींची नाराजी दूर करण्यात यश आल्यास यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीला अधिक बळ मिळणार आहे.

हेही वाचा : चंद्रपूर : निवडणुकीतील उमेदवारांची विकासकामे दाखवा अन् बक्षिस मिळवा! समाज माध्यमांवर पोस्ट सार्वत्रिक; भाजप – काँग्रेसमध्ये जुंपली

मुख्यमंत्री, गोविंदा यवतमाळात येणार

गवळींचा पत्ता कट करून नवीन उमेदवार दिल्याने यवतमाळ-वाशीमची जागा जिंकण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री संजय राठोड व महायुतीतील सर्व आमदारांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, दादा भूसे, संजय राठोड, अर्जुन खोतकर हे दिग्गज प्रचारात उतरले आहेत. महायुतीचे सर्व सहाही आमदार आपापल्या मतदारसंघात नियोजन करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र टीमही यवतमाळ व वाशीममध्ये सक्रिय झाली आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शुक्रवारी सायंकाळी यवतमाळात येत असून येथील अनेकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आढावाही ते घेतील. मुख्यमंत्र्यांसोबतच अभिनेता गोविंदा सुद्धा उद्या शनिवारी वाशीम, कारंजा व यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ रोड शो करणार आहे.