चंद्रपूर : गडचिरोली लोकसभेचे भाजप उमेदवार खासदार अशोक नेते यांचे दहा वर्षातील एक विकास काम दाखवा आणि बक्षिस मिळवा असे आवाहन विरोधी पक्ष नेेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तर चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे एक विकास काम दाखवा व बक्षिस मिळावा असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे. विकास कामांवर या दोन्ही मतदार संघात काँग्रेस व भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
गडचिरोली लोकसभा मतदार संघात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व चिमूर या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार येथे ठाण मांडून बसले आहेत. काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्यासाठी जाहीर सभा घेतांना महायुतीचे उमेदवार अशाेक नेते यांच्यावर टिका करित आहेत. कोरची या तालुक्याच्या ठिकाणी सभा घेतांना वडेट्टीवार यांनी भारनियमनाच्या मुद्यावर सरकारवर टिकास्त्र सोडले. तसेच जनतेला खोटी आश्वासने देऊन मूर्ख बनविणाऱ्या भाजपने सत्ता आल्यावर देश लुटण्याचे काम केले. तर स्थानिक खासदारांनी दहा वर्षात एकही लोकोपयोगी कार्य केले नाही. उलट पतसंस्था उघडून त्यातून हजारो लोकांची आर्थिक पिळवणूक केली. खासदार अशोक नेते यांचे गेल्या दहा वर्षातील एक विकास काम दाखवा आणि बक्षीस मिळवा असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
हेही वाचा : नागपूर : भरधाव शिवशाही बसने वाटसरूला उडवले
निष्क्रिय खासदार काही काम न करता आता मोदींच्या नावाने मत मागत आहेत अशा खासदाराला घरचा रस्ता दाखवून उच्चशिक्षित प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या डॉ. नामदेव किरसान यांना निवडून देऊन आपल्या लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करा,असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातही भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे विकास काम दाखवा व बक्षिस मिळवा असे आवाहन करित आहेत. समाज माध्यमावर विकास कामे दाखवून बक्षिस मिळविण्याच्या पोस्ट सार्वत्रिक होत आहे.
हेही वाचा : अवकाळी पावसाचा मुक्काम आता १५ एप्रिलपर्यंत, राज्यात आज कुठे आहे इशारा जाणून घ्या
महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील दिवंगत खासदार धानोरकर यांनी चार वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा त्यांच्या पत्नी तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जनतेसमोर ठेवावा असे आवाहन केले आहे. विकासाच्या मुद्यावर चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही लोकसभा मतदार संघात काँग्रेस व भाजपात चांगलीच जुंपली आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीत भाजपाकडे तर चंद्रपूरात काँग्रेसकडे सांगण्यासारखी विकास कामे नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते देखील निरूत्तर होतांना बघायला मिळत आहे.