यवतमाळ: दारव्हा-नेर मार्गालगत रेल्वे स्टेशनजवळ सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार निष्पाप मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे दारव्हा शहर शोकाकुल झाले आहे. मृतांमध्ये रीहान असलम खान (१३), गोलु पांडुरंग नारनवरे (१०), सोम्या सतीश खडसन (१०), आणि वैभव आशीष बोधले (१४) यांचा समावेश आहे. हे सर्व दारव्हा येथील रहिवासी होते.
सध्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम वेगाने सुरू आहे. दारव्हा शहरालगत पुलांचे बांधकाम सुरू असून त्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. पावसाळ्यामुळे हे खड्डे पाण्याने तुडुंब भरले आहेत. मात्र, या खड्ड्यांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी काही मुले या खड्ड्यात पोहण्यासाठी उतरली. मात्र, पाण्याची खोली जास्त असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले. हे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करून मुलांना बाहेर काढले आणि दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चौघांनाही मृत घोषित केले. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक तात्काळ रुग्णालयात पोहोचले. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. रेल्वे बांधकाम सुरू असताना कोणतीही सुरक्षितता न राखल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रेल्वे मार्ग नव्हे; मृत्यू मार्ग!
वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्गाचे काम जिल्ह्यात कासवगतीने सुरू आहे. या कामासाठी रेल्वे विभागाने असंख्य डोंगर पोखरले आहेत. गौण खनिजाची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या कामात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे करून ठेवले. सध्या पाऊस सुरू असल्याने हे खड्डे तुडुंब भरले आहेत. मात्र या ठिकाणी सुरक्षेची कुठलीही व्यवस्था नाही. रेल्वे मार्ग, उड्डाण पुलांसाठी वळण मार्ग तयार केले. तेथेही सुरक्षेचे उपाय केलेले नाहीत. सिमेंटचे मोठमोठाले खांब रस्त्यावर पडलेले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात होत आहेत. मात्र रेल्वे प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेविषयी गंभीर नसल्याने, नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. दारव्हा येथील घटनेनंतर या प्रकरणी दोषी रेल्वे अधिकारी, कंत्राटदाराविरुद्ध कठोर कारवाई करून मृतांच्या कुटुंबीयास रेल्वेतर्फे आर्थिक मदत व रेल्वेत नोकरी देण्याची मागणी पुढे आली आहे.