यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. मागील वर्षी कपाशीला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी आपला मोर्चा कपाशीकडे वळवला. वरवर हिरवेगार दिसणार्‍या कपाशीला चांगली बोंडेही लगडली आहेत. परंतु या बोंडामध्ये पुन्हा एकदा गुलाबी बोंड अळीने शिरकाव केला असून, शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. बोंडअळीमुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत चांगलीच वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहा-सात वर्षापूर्वी जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने थैमान घालत कपाशीचे पीक उद्ध्वस्त केले होते. या गुलाबी बोंडअळीने त्यावेळी शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट केली होती. राज्यस्तरावर कृषी विभाग खडबडून जागा झाला होता. कृषी विभागाने दोन-तीन वर्ष सातत्याने बोंड अळी येऊ नये म्हणून उपाययोजना व पाठपुरावा केला. परंतु बोंड अळी कमी होताच कृषी विभाग झोपेत गेला. यंदा परत याच बोंडअळीने पुन्हा डोके वर काढले आहे. आता कपाशीवर बोंडअळी येणार नाही असे शेतकर्‍यांना वाटत होते. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे कपाशीचे पीक जोमात आहे. पिकाला पाने, फुले, पात्या व बोंडेही मोठ्या प्रमाणात लगडली आहे.

हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या! केंद्राने उचलले पाऊल; काय आहेत शिफारशी? जाणून घ्या…

यावर्षी हमखास व चांगले उत्पन्न होणार अशी खात्री शेतकर्‍यांना आली होती. त्यामुळे शेतकरी हिरवे स्वप्न रंगवत होते. गुलाबी बोंडअळी या हिरव्या बोंडात कधी शिरली हे शेतकर्‍यांना कळलेच नाही. बाहेरून तजेलदार व ठसठसीत भरलेली बोंड आतून पूर्णपणे किडली आहेत. सध्या पाती गळ, लहान मोठे बोंडे गळण्याचे प्रमाण कपाशी पिकात दिसत आहे. पांढरी माशी व तुरतुरतुड्याचा प्रादुर्भाव कपाशीवर झाल्याचे दिसत आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास कपाशी या पिकावर आगामी काळात लाल्या येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कपाशीचे उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा : चंद्रपूर : कार्यकारी अभियंत्याला उत्कृष्ट खड्डे सम्राट अभियंता पुरस्कार, मनसेचे अनोखे आंदोलन

कृषी विभाग अनभिज्ञ

शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन कुठलीही माहिती न देता व पिकाचे निरीक्षण न करता कृषी विभागाचे केवळ फोटोसेशन सध्या सुरू आहे. बोंडअळीबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. केवळ कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहे. कृषी अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधावर न जाता जागेवरूनच अहवाल देत आहे. मागील वेळेचा कटू अनुभव लक्षात घेता कृषी विभागाने सतर्क राहून वरचेवर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने बोंडअळीचे संकट शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसून आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal farmers worried due to pink bollworm on cotton crop nrp 78 css