यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाजप या पक्षाचे नावही बाजूला केले असून मोदी सरकार म्हणून ते स्वत:चा उदोउदो देशभर करत असतात. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपविण्याचे काम स्वतः मोदी करीत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ गुरूवारी वणी येथील शासकीय मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.

हेही वाचा : नागपूर : दक्षिण-पश्चिममध्ये मतांचा आलेख खाली-वर; लोकसभा-विधानसभेत वेगळे चित्र

देशाला बरबाद करणारा पंतप्रधान तुम्हाला कधीपासून आवडायला लागला, असा घणाघात करत इलेक्ट्रॉरॉल बाँडच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने हप्ता वसुलीचे काम केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे, असे ते म्हणाले. सीमावर्ती भागात अन्य राष्ट्र भारताच्या सैनिकांची हत्या करत असताना आता ५६ इंचाची छाती कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. भाजप आणि मोदींना सत्तेबाहेर ठेवले तरच देश आणि येथील जनता सुखी आणि सुरक्षित राहील, असे आंबेडकर म्हणाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कुशल मेश्राम, बालमुकुंद घिरड, रमेश गजभिये, नीलेश विश्वकर्मा, डॉ . निरज वाघमारे आदींसह युवा व महिला आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.