नागपूर : भारतीय टपाल सेवा, ज्याला इंडिया पोस्ट म्हणूनही ओळखले जाते. हा भारत सरकारचा एक विभाग आहे. ही टपाल सेवा प्रदान करते. ही जगातील सर्वात मोठ्या टपाल प्रणालींपैकी एक आहे. ज्यामध्ये १, ५५,०१५ टपाल कार्यालये आहेत, त्यापैकी १, ३४,६४७ ग्रामीण भागात आहेत. भारतीय डाक विभागाकडून अनेक सेवा पुरवल्या जातात. यामध्ये डाक सेवा महत्त्वाची आहे. यात पत्र, पार्सल, अन्य डाक वस्तूंचे वितरण केले जाते.
यासोबतच वित्तीय सेवांचा समावेश आहे. ज्यात बचत बँक खाते, आवर्ती जमा, डाक जीवन विमा यांचा समावेश आहे. तर अन्य सेवांमध्ये मनी ऑर्डर, स्पीड पोस्ट अशा विविध सेवांना समावेश आहे. आता डाक विभागात नोकरीची चांगली संधी आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
ग्रामीण भागातील लोकांसाठी २४ मार्च १९९५ रोजी ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (आरपीएलआय) सुरू करण्यात आला. मल्होत्रा समितीने १९९३ मध्ये असे निरीक्षण नोंदवले होते की देशातील विमाधारक लोकसंख्येपैकी फक्त २२टक्के लोकांचा विमा उतरवण्यात आला आहे; एकूण घरगुती बचतीमध्ये जीवन विमा निधीचा वाटा फक्त १०टक्के होता. सरकारने मल्होत्रा समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आणि ग्रामीण भागात पोस्ट ऑफिसचे विस्तृत नेटवर्क आणि कामकाजाचा कमी खर्च यामुळे ग्रामीण भागात जीवन विमा व्यवसाय करण्यासाठी पोस्टल लाइफ इन्शुरन्सला त्याचे कव्हरेज वाढवण्यास परवानगी दिली.
या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण जनतेला विमा कव्हर प्रदान करणे आणि विशेषतः ग्रामीण भागातील दुर्बल घटकांना आणि महिला कामगारांना लाभ देणे आणि ग्रामीण लोकसंख्येमध्ये विमा जागरूकता पसरवणे आहे. या विभागामध्ये कुठल्याही पदवीधराला नोकरीची संधी आहे. नागपूर ग्रामीण विभागासाठी टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट विमा एजंट भर्ती केली जाणार आहे.
हे काम करण्यासाठी कुठल्याही शाखेतील पदवीधराला संधी आहे. यासाठी १५ जुलै पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी एक क्युआर कोड स्कॅन करायचा आहे. तो संकेतस्थळावर दिला असून त्यामाध्यमातून सविस्तर माहिती मिळणार आहे. याशिवाय नजीकच्या डाकघर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. डाक कार्यालयातून विमा एजंट बनण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.