नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे तब्बल पाच कोटी रुपयांच्या ‘हायड्रोपोनिक मारिजुआना’ या अत्यंत प्रतिबंधित ड्रग्जची मोठी खेप जप्त करण्यात आली. कतार एअरवेजच्या दोहा-नागपूर (फ्लाइट क्र. क्यूआर ५९०) विमानातून आलेल्या एका प्रवाशाकडून हे अमली पदार्थ सापडले असून, या घटनेने विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) आणि कस्टम्सच्या स्पेशल इंटेलिजन्स अँड इन्क्वायरी ब्रांच (एसआयआयबी) यांच्या संयुक्त पथकाने केली. डीआरआयला यापूर्वीच मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या प्रवाशावर लक्ष ठेवण्यात आले होते. तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेतून सुमारे पाच किलो ‘हायड्रोपोनिक मारिजुआना’ सापडले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे पाच कोटी रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीत समोर आले की आरोपीने ही खेप थायलंडची राजधानी बँकॉक येथून घेतली होती. त्यानंतर तो उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद, तेथून दोहा आणि शेवटी नागपूर असा प्रवास करून आला. पकडण्यात आलेले हे ड्रग्ज चरस, गांजा व भांगपेक्षा अधिक तीव्र परिणाम करणारे असून, त्याचा मानवी मेंदूवर झपाट्याने परिणाम होतो. आग्नेय आशियाई देशांत या प्रकारचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात आणि ते ‘रेव्ह पार्टी’साठी वापरले जाणारे ‘हाय-क्लास ड्रग्ज’ म्हणून ओळखले जातात. यात ‘टेट्राहायड्रोकॅनाबिनोल’ (THC) चे प्रमाण साध्या गांजापेक्षा जास्त असल्याने व्यसनाधीनतेचा धोका अधिक असतो.

अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपीकडून चौकशी सुरू असून, त्यामागील आंतरराष्ट्रीय साखळीचा शोध घेतला जात आहे. २० ऑगस्ट २०२३ रोजी नागपूर विमानतळावर २४ कोटी रुपयांचा फेटामाइन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर अल्पावधीतच झालेली ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.

हायड्रोपोनिक मारिजुआना म्हणजे काय?

हायड्रोपोनिक शेती ही मातीऐवजी पाण्यात पोषकतत्त्वे देऊन झाडे वाढविण्याची आधुनिक पद्धत आहे. या पद्धतीत उगवलेले ‘हायड्रोपोनिक मारिजुआना’ हे साध्या गांजापेक्षा अधिक तीव्र आणि जलद नशा देणारे असते. त्यातील टीएचसीचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूवर थेट परिणाम होतो आणि ते अत्यंत घातक व व्यसनकारक मानले जाते.