अकोला : खामगाव येथील तरुणाला जाती-धर्म विचारुन त्याच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेवरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची दयनीय अवस्था उघड झाली. या गंभीर घटनेनंतर आरोपींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. या सर्व प्रकाराला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे केला.

काही दिवसांपूर्वी खामगावमध्ये एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हल्लेखोरांनी तरुणाची जात आणि धर्म विचारून त्याला ‘गाय चोर’ म्हणत अमानुषपणे मारहाण केली आणि त्याला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण चित्रफीत समाज माध्यमावर पसरविण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्या तरुणावर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तरुणाची भेट घेत विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात आता कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. ‘मॉब लिंचिंग’च्या घटना सामान्य झाल्या आहेत. खामगाव येथे तरुणावर झालेला हल्ला देखील त्याचाच प्रकार आहे. समाजात जातीय तणाव पसरवणारी ही अतिशय धोकादायक घटना आहे. मागील काही काळात महायुती सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देत असून, गुन्हेगारीला खतपाणी घालत आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

यावेळी आमदार साजिद खान पठाण, प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, अशोक अमानकर, बबनराव चौधरी, महेंद्र गवई, धनंजय देशमुख, रामविजय पुरुंगळे, तेजेंद्र चौहान, डॉ. जिशान हुसैन, कपिल रावदेव, कपिल ढोके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चुकीच्या माणसांना संरक्षण आणि खऱ्यांना शिक्षा

चुकीच्या माणसांना संरक्षण आणि खऱ्यांना शिक्षा असे प्रकार राज्यात सुरू आहेत. अशा प्रकारणांमध्ये कायदे सक्षम आहेत. मात्र, त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे दिसून येते. दुर्दैवाने सध्या ते होत नाही. राज्य सरकार अशा प्रकारणांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुणावर अकोल्यात उपचार सुरू असतांना अद्याप बुलढाणा जिल्हा प्रशासनाकडून कोणताही अधिकारी भेटायला आला नाही. त्यांनी निवेदन घेतले नाही. कुटुंबीयांची संवेदना जाणून घेतली नाही. ही गोष्ट सरकारच्या असंवेदनशीलतेचे प्रतीक आहे, अशी टीका देखील त्यांनी केली.