अमरावती : शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी न मिळाल्याने प्रीती बंड यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांना निलंबित केले होते.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात प्रीती बंड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रीती बंड यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. उद्धव ठाकरे गटातून बडतर्फ केल्यानंतर माझी स्वगृही परतण्याची इच्छा होती पण मला बोलावले गेले नाही. पराभवानंतर एकनाथ शिंदेंनी आपुलकीने विचारपूस केली, म्हणून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया प्रीती बंड यांनी दिली.
शिवसेना हे माझे घर होते. आपल्याला कुणीतरी परत बोलवावे असे वाटत होते. आपल्या घराची प्रत्येक जण वाट पाहत असतो. पण, विधानसभा निवडणुकीला आता सहा महिने झाले आहेत. आपल्याला आता परत बोलावले जाणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर आपण शिंदे गटात प्रवेश करण्याचे ठरवले. निकालाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपुलकीने चौकशी केली.
शिवसेना शिंदे गट हा शिवसेना, भगवा आणि आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालणारा पक्ष असल्याने तो जवळचा वाटला, अशी प्रतिक्रिया प्रीती बंड यांनी दिली. जिल्ह्यातील तत्कालीन वलगाव विधानसभा मतदारसंघातून संजय बंड हे शिवसेनेच्या उमेदवारीवर तीन वेळा निवडून आले होते. ते दहा वर्षे जिल्हाप्रमुखही होते.
१३ डिसेंबर २०१८ रोजी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी दोन वेळा बडनेरा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. बंडखोरी करून निवडणूक लढविल्याने त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा पक्षात घेतले जाईल, या प्रतीक्षेत त्या होत्या. पण, ठाकरेंकडून विचारणा न झाल्याने व्यथित होऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
© IE Online Media Services (P) Ltd