बुलढाणा : काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी तुलना केली जात असे. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कुणाल कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात ‘पोलीस स्टेट’ आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
एका विनोदी कलाकाराने राजकीय नेत्यावर काही विनोद केला तर त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करायला हवा. पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहनसिंह तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही अत्यंत जहरी विनोद केले गेले, पण त्यासाठी कलाकार वा कोणा प्रेक्षकांना अशा पद्धतीने वेठीस धरले नाही.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नसतानाही त्यांच्या पक्षाने स्टुडिओची तोडफोड करणे, कामराला धमकी देणे, असे प्रकार सुरू आहेत. प्रेक्षकांनी कार्यक्रम पाहिला यात त्यांचा काय दोष? कामराला धमकी देणारे, स्टुडिओची तोडफोड करणारे मोकाट आणि कार्यक्रम पाहणाऱ्यांना पोलिसांचा जाच हा कसला न्याय? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे. महाराष्ट्राला पोलीस स्टेट बनवण्याचा हा उद्योग त्वरित थांबवावा. राज्यातील सरकारची कार्यपद्धती ही चोर सोडून संन्याशाला फाशी देणारी आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे.

गृहखाते, पोलीस विभाग अपयशी

भाजपा युतीचे सरकार येऊन तीन महिने झाले. या तीन महिन्यात बीड व परभणीत हत्या झाल्या, मुंबईत माजी मंत्र्याची हत्या झाली, सेलिब्रिटींना धमक्या येत आहेत, अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून जीवघेणा हल्ला झाला. स्वारगेट बसस्थानकात महिलेवर बलात्कार झाला, राज्यात सेलिब्रिटीपासून सरपंचापर्यंत कोणीही सुरक्षित नाही. कोयता, आका, खोक्या, अशा टोळ्या उघडपणे गुन्हे करत आहेत, पण गृहखाते व पोलीस विभाग ही गुन्हेगारी रोखू शकत नाही. पुण्यासारख्या शहरांपासून धारशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत अंमली पदार्थ विकले जाते, त्यावर आळा घालता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर वचक नाही. फडणवीसांचे पोलीस फक्त विरोधकांवर कारवाया करणे, विरोधकांचे फोन टॅप करणे, लोकशाही मार्गाने आंदोलन करू न देणे व सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.

फडणवीस यांना गृहविभागाला वेळ देता येत नाही

सत्ताधारी पक्षाचे मंत्री थेट धमक्या देतात, पण गृहमंत्री धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. गृहमंत्री व पोलीस महासंचालक ही दोन्ही पदे शोभेच्या बाहुल्या बनल्या आहेत. फडणवीसांना गृहविभागाला वेळ देता येत नाही, त्यांनी राज्याचे हीत लक्षात घेऊन पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री नेमावा. मुदतवाढ दिलेल्या पोलीस महासंचालकांना सन्मानाने निवृत्त करून नवीन सक्षम निष्पक्षपाती अधिकाऱ्याची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करावी, अशा मागण्याही सपकाळ यांनी केल्या आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Law and order situation in maharashtra deteriorated since fadnavis took charge of home ministry says congress harshvardhan sapkal scm 61 zws