नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे आपल्या राजकीय कॅरिअरसाठी मैदान तयार करीत आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले सत्यजित यांनी यापूर्वीच काँग्रेसच्या नाकावर टिच्चून भाजपच्या मदतीने विधानपरिषद गाठली.

सत्यजीत तांबे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंड भरून कौतुक केले होते. त्यामुळे अपक्ष आमदार असलेल्या सत्यजीत तांबे विषयी तर्कविर्तक लावले जात होते. आता त्यांनी चक्क काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींवर टीका करून त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचाल काय असेल याचे संकेत दिले आहेत.

आमदार सत्यजीत तांबे यांना विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसने दिली होती. मात्र ऐनवेळी ते स्वतंत्र लढले आणि जिंकले. त्यावेळी त्यांना भाजपने तसेच काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना मदत केल्याची चर्चा होती. आता त्यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी काँग्रेस पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांना वेळ देत नसल्याची टीका तांबे यांनी केली. त्यावर काँग्रेसचे विधीमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्यजीत तांबे यांचे लक्षण ठिक नसल्याची प्रतिक्रिया दिली. विजय वडेट्टीवार यांनी सत्यजीत तांबे काँग्रेस सोडण्याची शंका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सत्यजित तांबे यांनी केलेले वक्तव्य बघता ते फार काळ काँग्रेससोबत राहतील असे दिसत नाही. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली होती आणि आता राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

सत्यजितने सत्य बोलणे सोडले आहे. तो आता असत्याचा बाजूने चालला आहे. सत्याची साथ सोडून असत्याला साथ देणे, हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हते. यावरून त्याची पुढची वाटचाल कुठल्या बाजूने सुरू आहे हे स्पष्ट होते आहे, असे वडेट्टीवार यांनी गुरूवारी नागपूर येथे पत्रकारांना सांगितले.
राहूल गांधी सर्वांना भेटतात. वेळही देतात. काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांना भेटून आलो. दोन तास चर्चा झाली. ते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. ते उठसूठ कोणालाही कसे भेटणार? असा सवाल उपस्थित त्यांनी केला.

सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली. मात्र, निवडणूक स्वतंत्रपणे लढली. एबी फॉर्म घेऊन त्यांनी आम्हाला दगा दिल्याचा आरोप त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सत्यजित तांबे यांचे मामा, माजी मंत्री व प्रदेशध्यक्ष बाळासाहेबत थोरात यांच्यामध्ये त्यावेळी मोठे वाद झाले होते हे येथे उल्लेखनिय.