नागपूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची तजवीज करण्यासाठी शासकीय ,निमशासकीय तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांकडून त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती मागवण्यात आली होती. पण गुरूवारी शेवटच्या दिवशीपर्यंत ६७० शाळा, महाविद्यालय व कार्यालयांनी माहिती पाठवली नाही.

हेही वाचा… नागपूर : सकल मराठा समाजाने स्पष्टच सांगितले, म्हणाले “ते कार्यकर्ते भाजपचे”

हेही वाचा… अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…

नागपूर जिल्ह्यात नागपूर व रामटेक असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या संख्येत मनुष्यबळाची गरज भासते. त्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी विविध शासकीय-निमशासकीय कार्यालय, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालय यांच्याकडून मनुष्यबळाची माहिती मागविण्यात आली होती. माहिती पाठवण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला तब्बल ६७० कार्यालये, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांकडून कर्मचारी व अधिकारी यांची माहिती अप्राप्त आहे. ही माहिती सोमवारी ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील मनुष्यबळाची डाटा एन्ट्री सुरू असलेल्या कक्षात (एनआयसी) जमा करावी. सदरची माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करतील किंवा माहिती लपविण्याचा प्रयत्न करतील त्याविरोधात लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये निवडणुकीच्या कामात कसूर केला आहे, असे गृहीत धरून त्यांचेविरुद्ध नियमानुसार ५मार्चपासून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी कटाक्षाने नोंद घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.