नागपूर : नोकर भरती प्रक्रियेत अनियमितता प्रकरणात महापारेषणच्या मुख्य महाव्यवस्थापकांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कारवाईमुळे भरती प्रक्रियेतील इतरही अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गंभीर असलेले नोकर भरती प्रकरण नेमके काय? याबाबत आपण जाणून घेऊ या.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये महापारेषणचे मुख्य महाव्यवस्थापक सुगत गमरे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) मंगेश शिंदे, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) अभय रोही, वरिष्ठ व्यस्थापक (मानव संसाधन) संदीप धाबर्डे यांचा समावेश आहे. महापारेषणने जून २०२४ मध्ये विद्युत सहाय्यकांच्या २ हजार ६०० पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली होताी. आवश्यक प्रक्रियेनंतर २ हजार ४०० उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले होते. उर्वरित २०० पदांची नियुक्ती सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (एसईबीसी)सह इतर कारणाने वादात सापडली होती.
कालांतराने या दोनशे उमेदवारांच्या नियुक्तीचाही मार्ग मोकळा झाला. महापारेषणकडून या २०० उमेदवारांना नियुक्तीसाठीचे स्थळ निवडण्यासाठी झोननिहाय प्राधान्यक्रम घेण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात नियुक्तीपत्र देतांना प्राधान्यक्रमाला वाटाण्याच्या अक्षता लावून उमेदवारांना पहिलेच्या ऐवजी दुसऱ्या वा तिसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य निवडलेले झोन नियुक्तीसाठी देण्यात आले. यावरून वाद उद्भवला होता. शेवटी या प्रकरणात महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी महापारेषणच्या मुख्य महाव्यवस्थापकांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले. आणखी काही अधिकारीही या प्रकरणात रडारवर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या विषयावर महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्याशी भ्रमनध्वनीवर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
महापारेषण अधिकाऱ्यांचे म्हणणे काय ?
महापारेषणने केलेल्या प्राथमिक चौकशीत भरती प्रक्रियेत अनियमितता आढळल्याने चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. या प्रकरणाची आणखी चौकशी केली जात असून अहवालानंतर खरी माहिती पुढे येईल, अशी माहिती महापारेषणच्या मुंबई कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी मिलिंद आवताडे यांनी दिली.
महापारेषण कंपनीचे काम काय ?
राज्यातील पूर्वीच्या ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’ या संस्थेची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर जून २००५ मध्ये ‘महापारेषण’ कंपनी अस्तित्वात आली. विजेच्या निर्मिती स्थानापासून ते वितरण केंद्रापर्यंत वीज पोहोचविण्याची म्हणजेच विजेचे पारेषण करण्याची जबाबदारी महापारेषण कंपनीवर आहे. यासाठी महापारेषण कंपनीची विधीवत रचना करण्यात आली. ही कंपनी राज्य शासनाच्या ऊर्जा खात्याच्या अखत्यारीत असते. सध्या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय समचालक पदाची जवाबदारी डॉ. संजीव कुमार यांच्याकडे आहे.