नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशिपसारख्या योजना राबविण्यात येतात. त्यानुसार आता महाज्योती संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये ‘उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या निर्णयामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फायदा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक गुणवत्तेचे शिक्षण डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्लास रूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या धर्तीवर विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता सीड अंतर्गत घरकुले बांधण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या महामंडळांच्या लाभार्थ्यांकरीता वेबपोर्टलची निर्मिती तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबतही प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा. इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्ध होण्याबाबत मुख्य सचिव यांच्याकडे संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा : ‘आनंदवन’ला तीन कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांकडून तातडीची मदत; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते. महाज्योतीच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. सध्या महायुतीचे मुख्यालय नागपूर येथे आहे. त्यामुळे राज्याच्या इतर भागातील विद्यार्थ्यांना केंद्राशी संपर्क साधण्यात अडचणी येतात. यामुळे या निर्णयाचा अनेक उमेदवारांना फायदा होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahajyoti to form utkrushtata kendra in five districts for obc students dag 87 css