नागपूर : नागपूर येथील एक्स सीओच्या १०५ एकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या विस्तारित लॉजिस्टिक पार्कमुळे देश-विदेशातील कार्गो वाहतुकीला नवे बळ मिळणार आहे. या लॉजिस्टिक पार्कमधून मालवाहतुकीस अधिक वेग देण्यासाठी नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. या जोडणीमुळे समुद्री मार्गाने आयात-निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शनिवारी येथे झालेल्या एक्स सीओ लॉजिस्टिक पार्कच्या विस्तार प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
त्यांनी सांगितले की, वाढवण बंदर हे जगातील पहिल्या पंधरा मोठ्या बंदरांपैकी एक मानले जाते. समृद्धी महामार्गापासून वाढवण बंदरापर्यंत एक ‘डेडिकेटेड ॲक्सेस-कंट्रोल रोड’ तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठीच्या आराखड्याला (नकाशाला) मान्यता देण्यात आली असून त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडले गेल्याने विविध लॉजिस्टिक्स पार्क, औद्योगिक क्षेत्रे आणि इंडस्ट्रीज यांना थेट आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या लॉजिस्टिक पार्कचा विस्तार पूर्ण होईपर्यंत समृद्धी महामार्गाच्या वाढवण बंदराशी जोडणीचे कामही पूर्ण केले जाईल. त्यामुळे नागपूर हे देशातील एक महत्त्वाचे मल्टिमोडल लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले की, नवीन लॉजिस्टिक पार्कमुळे गुंतवणूक, रोजगार आणि औद्योगिक वाढीला मोठी चालना मिळेल. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, येथून कार्गो देशाच्या विविध भागांत तसेच विदेशात पाठवणे अधिक परिणामकारक ठरेल. शासनाच्या या पावलामुळे विदर्भातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल.
नागपूर शहराच्या औद्योगिक प्रगतीला नवे वळण देणारी ऐतिहासिक गुंतवणूक एक्स सीओ या कंपनीने जाहीर केली आहे. कंपनीने नागपूरात तब्बल दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून अत्याधुनिक आणि भव्य असे लॉजिस्टिक पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे शहरात दहा हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात जागतिक पातळीवरील गुंतवणूक संस्था ब्लॅकस्टोन देखील सहभागी झाली आहे. या माध्यमातून नागपूरमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात परदेशी थेट गुंतवणूक (FDI) होत आहे. यामुळे शहराचा औद्योगिक दर्जा तसेच गुंतवणुकीसाठीची प्रतिमा अधिक सक्षम होणार आहे. यापूर्वी या भागात २ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात आली होती. त्यानंतर सुधारित प्रकल्प आराखडा तयार करून पुढील टप्प्यात ३००० कोटी रुपयांची आणखी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व गुंतवणुकींच्या एकत्रित परिणामातून नागपूरमध्ये अत्याधुनिक वेअरहाऊसिंग, ट्रान्सपोर्ट नेटवर्क, कोल्ड स्टोरेज आणि सप्लाय चेन व्यवस्थापनाची मजबूत संरचना उभी राहणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
