नागपूर: नागपूरसह राज्यातील बऱ्याच भागात टी. ओ. डी. (टाइम ऑफ डे) मीटरच्या नावावर स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जात आहे. त्याला विरोधही होत आहे. या मीटरबाबतचे प्रकरण उच्च न्यालायात प्रलंबित आहे. त्यातच महावितरणकडून हे मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ८० पैशांची सवलत जाहीर झाल्याचा दावा करत त्यासाठी टी. ओ. डी. मीटर बसवून घ्यावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागपूर परिमंडळात आतापर्यंत ३.३४ लाख ग्राहकांनी हे मीटर बसवून २२.७२ लाखांची सवलत मिळाल्याचाही महावितरणचा दावा आहे.

महावितरणकडून टी. ओ. डी. मीटर बसवलेल्या नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांना २१ लाख २९ हजाराची तर वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांना १ लाख ४३ हजार रुपयांची सूट मिळाली आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडळात टीओडी मीटरचा वापर करून वीजबिलात सवलत घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात सद्यस्थितीत एकूण ७९ हजार ५४ ग्राहकांनी १४ लाख ८९ हजार ४ रुपयांची सवलत घेतली आहे. तर जुलै महिन्यात वर्धा जिल्ह्यातील ११ हजार १७६ तर नागपूर जिल्ह्यातील ८८ हजार ७३७ ग्राहकांसह परिमंडलातील एकूण ९९ हजार ९१३ ग्राहकांना ७ लाख ८३ हजार ५६५ रुपयांची सवलत मिळाली आहे.

महावितरणकडून वीज ग्राहकांकडे बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट टीवोडी मीटरमुळे वीज ग्राहकांना अचूक आणि वेळेत वीज बिल मिळत आहे. सरासरी वीज बिल, फॉल्टी मीटर बिल यासारख्या तक्रारींमध्ये मोठी घट झाल्याचा महावितरणचा दावा आहे. वापराएवढेच अचूक वीजबिलाची नोंद करणाऱ्या स्मार्ट टीवोडी मीटर बसविण्यासाठी नागपूर परिमंडलात ४६१ ग्राहकांनी स्वतःहून महावितरणकडे मागणी केली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ३८७ तर वर्धा जिल्ह्यातील ७४ ग्राहकांचा समावेश आहे. टीओडी मीटरमुळे तुम्हाला तुमच्या वापरावर आधारित अचूक बिल मिळते. त्यामुळे सरासरी बिलांच्या आणि जुन्या मीटरमुळे येणाऱ्या तक्रारी कमी झाल्याचा महावितरणचा दावा आहे.

दिवसा वीज वापरावर सवलत किती?

दिवसा वीज वापरल्यास प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपयापर्यंतची सवलत मिळते. यामुळे तुमच्या वीजबिलात थेट बचत होते. महावितरण हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांना मोफत लावून देत आहे. त्यामुळे तुमच्यावर कोणताही आर्थिक भार येत नाही. हे मीटर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे त्याचे मासिक रीडिंग आपोआप घेते. मीटर रिडिंगसाठी कोणाच्याही हस्तक्षेपाची गरज नसल्याचा महावितरणचा दावा आहे.

टीओडी मीटरबाबत शंका असल्यास…

महावितरणने नागपूर परिमंडलात मॉन्टेकार्लो या कंपनीला हे मीटर लावण्याचे काम दिले आहे. टीओडी मीटरबद्दल काही शंका किंवा प्रश्न असल्यास, महावितरणने दिलेल्या गुगल फॉर्म लिंक किंवा क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकत असल्याचा महावितरणचा दावा आहे.