गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे पुत्र डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आणि तर्कवितर्कांना उधाण आले. यामुळे मनोहर चंद्रिकापुरे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. सुगत शिंदे गटात गेला असला तरी मी राष्ट्रवादीतच कायम राहणार, अशी स्पष्टोक्ती आता त्यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मनोहर चंद्रिकापुरे यांना अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून तिकीट दिले. चंद्रिकापुरे यांच्या विजयात पटेल यांची मोलाची भूमिका होती. यानंतर पटेल यांनी त्यांच्याकडे मोरगाव मतदारसंघाची मोठी जबाबदारी सोपवली. मात्र, सुगत चंद्रिकापुरे यांनी दोन नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले. सुगत यांचा शिंदे गटातील प्रवेश प्रफुल्ल पटेल यांच्यासह आ. चंद्रिकापुरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – यंदा मान्सून चांगला, पण…; भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला दीर्घकालीन अंदाज काय? जाणून घ्या..

सुगत यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश हे त्यांचे दुर्दैवी पाऊल आहे. मला कुठलीही माहिती न देता आणि माझ्या परवानगीशिवाय त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये. मी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण निष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत राहीन. पक्षाने आ. अनिल देशमुख आणि माझ्यावर विदर्भातील ६ जिल्ह्यांतील बुथ कमिट्यांची जबाबदारी सोपविली आहे. मला आजपावेतो जो राजकीय मानसन्मान मिळाला तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यामुळेच मिळाला, असे आ. चंद्रिकापुरे यांनी स्पष्ट केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar chandrikapure comment after sugat entered the shinde group sar 75 ssb