अकोला : एकनाथ शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार सध्या नाराज आहेत. नाराज आमदारांना सोबत ठेवण्यासाठी शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटातील आमदार संपर्कात असल्याच्या वावड्या उठवण्याचा खटाटोप सुरू आहे, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. ठाकरे गटातील एकही आमदार शिंदे गटाच्या संपर्कात नसल्याचा दावाही आ. देशमुख यांनी केला.
ठाकरे गटातील १३ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी केले होते. त्याला देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. १६ आमदारांसंदर्भातील निर्णय विरोधात जाण्याची भिती मुख्यमंत्री शिंदे यांना आहे. त्यामुळे शिंदे गटातील उरलेले २४ आमदार सोबत ठेवण्यासाठी अशी दिशाभूल करणारी वक्तव्य केली जातात. हे आमदार सहा वर्षांसाठी अपात्र झाले तर ते निवडणूक लढू शकणार नाहीत. त्यामुळेच २४ लोक सोबत ठेवण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. शिंदे गटातील अनेक आमदार सध्या नाराज आहेत. ही नाराजी ते खासगीत बोलून देखील दाखवतात, असा दावा आमदार देशमुख यांनी केला. दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेतला. आमच्या पाठीमागे लागाल तर तिघाही राणे पिता-पुत्रांचे कपडे उतरवू, असा इशारा आ. देशमुख यांनी दिला.