नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी एका कार्यक्रम संविधानातील धर्मनिरपेक्ष शब्दावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या शब्दावरून वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी नवीन दावा केला आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधानाची निर्मिती करताना धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या दोन्ही शब्दावर चर्चा झाली होती. त्यावेळी त्याला विरोध झाला होता. आणीबाणीनंतर या शब्दांचा संविधानामध्ये समावेश करण्यात आला. खुद्द संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही धर्मनिरपेक्षता या शब्दाचे समर्थन केले नाही, असा दावा करत हे शब्द संविधानातून वगळण्यासंदर्भात चर्चा व्हावी असेही ते म्हणाले. 

विश्व हिंदू परिषद आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने काशी येथे नुकतेच युवा अध्यात्मिक संमेलन घेण्यात आले. येथे युवकांमधील व्यसनमुक्तीवर देशभर जनजागृती कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय झाला. या उपक्रमासंदर्भात परांडे यांनी पत्रकार परिषेत माहिती दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संघटनांकडून संविधानामधील धर्मनिरपेक्षता या शब्दावर अनेकदा आक्षेप घेतला जातो.

त्यावर परांडे म्हणाले की, कुठलीही चर्चा न करता इंदिरा गांधी यांनी या शब्दांचा समावेश केला आहे. मात्र, आज हे शब्द वगळण्यासंदर्भात चर्चा होणे आवश्यक आहे. संविधान निर्मात्यांसह अन्य सदस्यांचाही या शब्दाला विरोध होता, असेही ते म्हणाले. हिंदू समाजामध्ये फूट पाडून त्यांना आपसात लढवण्यासाठी काही शक्ती काम करत आहेत. हिंदू धर्मातील सण, उत्सवाबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांना त्यापासून दूर करण्याचे काम होत आहे. त्यामुळे अशा शक्तींविरोधात आम्ही काम करणार असल्याचेही परांडे म्हणाले.

बांग्लादेशी हिंदूंना नागरिकत्व मिळणार

आज देशातील काही राज्यात राजकीय हेतूने बांग्लादेशातून आलेल्या हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे. त्यांना नागरिकत्व नाकारले जात आहे. अशा सर्व हिंदूंना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी विश्व हिंदू परिषद काम करत असल्याची माहिती परांडे यांनी दिली. हिंदू असल्याचे सिद्ध करणाऱ्या प्रत्येकाला नागरिकत्व मिळवून देण्यासाठी संघटन काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्यसन मुक्तीसाठी देशभर जनजागृती

काही विदेशी शक्ती भारतातील तरुणांना व्यसनाच्या आहारी जाण्यासाठी भाग पाडत असल्याचा आरोप परांडे यांनी केला. यात शाळकरी मुलेही बळी पडत आहेत. त्यामुळे तरुण पिढीला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषद देशभरात पाच हजारांहून अधिक जनजागृती उपक्रम राबवणार असल्याची माहिती परांडे यांनी दिली. २०४७ पर्यंत भारत व्यसनमुक्त करण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले.