बुलढाणा : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघांचे आमदार किरण सरनाईक यांच्या वाहनाने भरवेगात युवकाला धडक दिली. यामुळे सदर युवकाला गंभीर अवस्थेत चिखली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे चिखली शहरात तणाव निर्माण झाला आहे.

गुरुवारी (१८ सप्टेंबर) ही दुर्घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक (रा. वाशिम) यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या युवकाला भर वेगात उडविले. कृष्णा नंदू लष्कर (वय २५, रा. गौरक्षण वाडी, चिखली, जि. बुलढाणा ) असे अत्यवस्थ युवकाचे नाव आहे. चिखली नगरीतील पानगोळे हॉस्पिटलसमोर हा अपघात झाला.

या भीषण अपघातात कृष्णा गंभीर जखमी होऊन सध्या कोमात गेला आहे. आमदार किरण सरनाईक यांनी अपघात नंतर जखमी युवकास आपल्या वाहनाने चिखलीतील जवंजाळ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. आमदार किरण सरनाईक हे बुलढाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी जात होते. शिंगणे यांच्या मातोश्री प्रभावती शिंगणे यांचे नुकतेच निधन झाले आहे.

नागरिकांनी अशा घटना रोखण्यासाठी आमदार व अधिकाऱ्यांनी गाड्यांचा वेग मर्यादित ठेवावा आणि अपघात ग्रस्तांसाठी जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली आहे. या अपघात प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिली. या घटनेमुळे चिखली परिसरासह बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अपघातास कारणीभूत वाहन (इनोव्हा कार) चिखली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.