बुलढाणा : मुंबई मधील ( आकाशवाणी )आमदार निवास मधील कॅन्टीन कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण करून बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड राज्यात खळबळ उडवून दिली. पावसाळी अधिवेशनसह राजकीय वर्तुळात आणि माध्यम जगतात वादळी चर्चा, वादंगाला ते कारणीभूत ठरले. शिवसेना शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी शुक्रवारी, ११ जुलैला पुन्हा एकदा वादग्रस्त विधाने करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.
कँटीन कर्मचारी मारहाण प्रकरणात राज्यभर वादाचा, टिकेचा, खमंग चर्चेचा विषय ठरणारे आमदार संजय गायकवाड आज शुक्रवारी बुलढाण्यात परतले. त्यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून स्वच्छतेचा आणि इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेतला. सोबत आक्रमक कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा ताफा होताच. यावेळी निवडक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी सोबत त्यांनी फ्रिस्टाईल मारहाणी वर मनमोकळा संवाद साधला. या मारहाणीचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे त्यांनी समर्थन केले. यावेळी आमदार गायकवाड म्हणाले की, आमदार निवास मधील कँटीन मधील खाध्य पदार्थांचा दर्जा नीत्कृष्ट असतो हे सर्वांनाचं माहिती आहे, होते.येथील ठेकेदार वर्षभर लाखो लोकांना नीत्कृष्ट दर्जाचे अन्न खाऊ घालतो. मात्र मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? हा प्रश्न होता. ते काम मी केले एवढंच.
माझ्या मारहाण वरून वादळ उठले. आता माझा चुकीचा होता, पण उद्धेश चांगला होता. किंबहुना दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास, ‘ रास्ता गलत था, मंजिल सही थी’ अश्यातला हा प्रकार आहे. मात्र कँटीन मधील मनमानी, नीत्कृष्ट दर्जा यामुळे मला कायदा हाती घ्यावा लागला. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणी कारवाईत कँटीन मध्ये तब्बल ७९ त्रुटी निघाल्या. याचा अर्थ कँटीन चालकाने ( कंत्राटदाराने ) ७९ वेळा नियम भंग केला असाही होतॊ.
सामना व राउतावर टीका
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधील मारहाण संदर्भातील लिखाणावार विचारणा केली असता आमदार गायकवाड यांनी शेलक्या भाषेत टीका केली. त्या सामना व संजय राऊत ला कोण हुंगते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकीकडे मराठी मराठी करायचे अन दुसरीकडे कँटीन चालक ( कंत्राटदार) शेट्टी याला पाठीशी घालायचे? हा काय प्रकार म्हणावा. तो शेट्टी काय राउताच्या * * लागतो? असा प्रश्न त्यांनी केला.
शिवसेनेची स्थापना झाल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी पहिले आंदोलन दक्षिणात्य व्यवसायिका विरुद्ध केले, याची आठवण आमदार गायकवाड यानी करवून दिली. याच मंडळींनी मुंबईच्या कांना कोपऱ्यात डान्स बार उघडून आपली संस्कृती बिघडवली, तरुण पिढी बर्बाद केली. “मी जे केलं ते योग्य केलं. तो शेट्टी आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का ? असा सवाल त्यांनी राऊत यांना उद्धेशून केला.सामनाच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना संजय गायकवाड यांनी विरोधकांची बोलती बंद केली असून, त्यांच्या या आक्रमक विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.