लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राज्यात मोसमी पावसाच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरीही अजून पूर्वमोसमी पावसाचा धुमाकूळ राज्याच्या अनेक भागात सुरू आहे. आता भारतीय हवामान खात्याने शनिवारी विदर्भासह उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यातील मोसमी पावसाचा प्रवेश गेल्या काही वर्षांपासून वादाचा विषय ठरला आहे. मोसमी पाऊस हा संथ आणि सलग येतो. तर पूर्वमोसमी पाऊस हा गडगडाटी असतो. तरीही केरळमध्ये मोसमी पावसाचा प्रवेश झाला की महाराष्ट्रातही त्याच्या घोषणेची अतिघाई होते. मात्र, याचा परिणाम शेतकऱ्यांवर होतो, हे कुणीच लक्षात घेत नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे संपूर्ण गणित मोसमी पावसावर अवलंबून असते. त्यामुळे हे अंदाज अचुकच देणे अपेक्षित असते. हवामान अभ्यासकांच्यामते खात्याच्याच संकेतस्थळावर मोसमी पावसाचे निकष पूर्ण झालेले दिसून येत नव्हते. तरीही राज्यातील मोसमी पावसाच्या प्रवेशाची घोषणा करण्यात आली.

आणखी वाचा-बुलढाणा : पाणी टंचाई खर्चाचे ‘मीटर’ सुसाट! टँकर पाऊणशेच्या घरात, पावणेआठ कोटी…

आताही राज्यात अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच आता हवामान खात्याने शनिवारी विदर्भासह उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पूढील पाच दिवस पावसाची ही वाटचाल कायम असणार आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह ‘येलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गात हवामान खात्याकडून मासेमारांना इशारा देण्यात आला आहे. त्यांनी किमान ११ जूनपर्यंत मासेमारीची साधने समुद्रात नेऊ नये असे सांगितले आहे.

आणखी वाचा-“नवनीत राणा पराभूत झाल्‍याचा महाराष्‍ट्राला आनंद” बच्‍चू कडू यांनी भाजपला डिवचले

यावर्षीच्या मोसमात कमी वेळेत अधिक पाऊस राहील, असेही हवामान खात्याने सांगितले आहे. पुणे शहरात चार दिवसांपूर्वी ते दिसूनही आले आहे. यंदा राज्यात वर्षभर अवकाळी पावसाने ठाण मांडले होते. त्यावेळीदेखल कमी वेळात अधिक पाऊस दिसून आला. उत्तर गुजरातमध्ये सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर मध्यप्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. संपूर्ण विदर्भात शनिवारपासून पुढील पाच दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्याची अखेर आता नागरिकांसाठी पावसाळी ठरणार असून, सध्या शाळांना सुट्या असल्याने पावसाळी पर्यटनाचे बेत देखील आखले जात आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon update warning of heavy rain with storm in the state rgc 76 mrj