नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ चा पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरही अद्याप शारीरिक चाचणीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तर पोलीस उपनिरीक्षक २०२३च्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीच्या जाहीर झालेल्या वेळापत्रकात ऐन वेळेवर बदल करण्यात आल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. शिवाय शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी उमेदवारांना खर्चाचा भूर्दंडही सहन करावा लागत आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने पुन्हा शारीरिक चाचणी पुढे जाण्याची भीती आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालानुसार, उमेदवार शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची यादी, त्यांचे बैठक नंबर आणि कटऑफ गुण एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. निवडलेले उमेदवार पात्रता निकषांच्या पडताळणीच्या अधीन असतील असे आयोगाने सांगितले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत शारीरिक चाचणीचे वेळापत्रक येणे अपेक्षित होते. यामुळे उमदेवारांना पुढील तयारीसाठी नियोजन करता येते. मात्र, आयोगाकडून अद्यापही वेळापत्रक आलेले नाही. तर दुसरीकडे एमपीएससीने पोलीस उपनिरीक्षक २०२३च्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ३ ते १७ नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयोजित केली होती. मात्र, प्रशासकीय कारण दाखवून ही शारीरिक चाचणीही पुढे ढकलण्यात आली. वेळेत शारीरिक चाचणी होत नसल्याने उमदेवारांची चिंता वाढली आहे.
उमेदवारांवर खर्चाचा भूर्दंड
शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी उमेदवारांना नियमित पौष्टीक आहार आणि क्रीडांगणावर तयारी करावी लागते. यासाठी अनेकदा प्रशिक्षकही नेमले जातात. अनेक परीक्षार्थी हे आपल्या मुळ गावापासून शहराच्या ठिकाणी राहून परीक्षेची तयारी करतात. यासाठी त्यांना महिन्याला किमान दहा हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. शारीरिक चाचणी वेळेत होत नसल्याने उमदेवारांचा हा भूर्दंड सहन करावा लागतो आहे.
एमपीएससीचे म्हणणे काय?
पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी मुंबई येथे होणार होती. मात्र, काही प्रशासकीय कारणाने ती रद्द करण्यात आली असून नवीन वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे, असे एमपीएससीकडून सांगण्यात आले.