बुलढाणा: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वर्षा बंगल्यावरील आंदोलनापूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र नेता अडकला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र इतर ठिकाणी का होईना शेतकरी आत्महत्या प्रात्यक्षिक केले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तुपकर यांनी मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आज २३ ऑगस्ट रोजी शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनासाठी तुपकर काल गुरुवारी मुंबईत दाखल झाले. पदाधिकारी आणि शेतकरी वेगवेगळ्या मार्गांनी काल रात्री उशिरापर्यंत राजधानीत दाखल झाले. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार असल्याने मुंबई पोलीस ‘अलर्ट मोड’ वर होते.

काल रात्री पोलिसांनी तुपकरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते हाती लागले नाहीत. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दिनांक २३) आंदोलनासाठी जात असताना त्यांना ‘मरीन ड्राईव्ह’ परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यांना आझाद हिंद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांनी मग पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसह तळ ठोकला. दुसरीकडे काही युवा शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटीवर शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करून आंदोलन केले. गळाला फास लावून घेण्याचा प्रयत्न करताच तिथे उपस्थित पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले.

हेही वाचा : नागपूर : ‘माया’चे गुढ कायम! ताडोबात वर्षभरानंतरही…

रविकांत तुपकरांना आझाद मैदान पोलीस स्टेशन परिसरात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले.तुपकरांच्या अर्धांगिनी ॲड. शर्वरी तुपकर व अन्य एका वकिलाने त्यांची बाजू मांडली. त्यापूर्वी प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना ते म्हणाले की, ‘मला जरी पोलिसांनी अटक केली असली तरी शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. काही दिवसात आपल्या हक्कासाठी संपूर्ण राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरलेले दिसतील, मग मात्र ते सरकारला जड जाईल.

हेही वाचा : एसटी कामगार पुन्हा रस्त्यावर… कृती समिती काय म्हणते…

यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २० ऑगस्ट रोजी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे. त्यामुळे सरकारचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन २३ ऑगस्ट रोजी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या “वर्षा” या शासकीय निवासस्थानी ‘शेतकरी आत्महत्या कसे करतात याचे प्रात्यक्षिक दाखवून’ आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता.