चंद्रपूर : सलग पाच वर्षे नगराध्यक्षपद उपभोगल्यानंतर भद्रावतीचे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ब्रम्हपुरी काँग्रेसच्या नगराध्यक्ष रिता उराडे भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. वरोरा पालिकेत भाजपच्या झेंड्याखाली नगराध्यक्ष झालेले अहेतेश्याम अली यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. २०१६ ते २०२१ या पंचवार्षिक काळात चंद्रपूर जिल्ह्यात पाच नगरपालिकेवर भाजपची सत्ता होती. तर काँग्रेसकडे तीन नगरपालिका होत्या आणि शिवसेनेची (उद्धव ठाकरे गट) एका नगरपालिकेत सत्ता होती. आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय कोलांटउड्या बघायला मिळत आहे.
जिल्ह्यात बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, घुग्घूस, राजुरा, गडचांदूर, चिमूर, मूल, नागभीड या दहा नगरपालिका व भिसी नगर पंचायतमध्ये निवडणुक होत आहेत. मागील साडेतीन वर्षांपासून या सर्व पालिकेत प्रशासक राज आहे. या काळात नगराध्यक्षपदाचा पूर्ण उपभोग घेतल्यानंतर अनेकांनी पक्षीय कोलांटउड्या मारल्या आहेत. यामध्ये भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी शिवसेना व्हाया काँग्रेस असा प्रवास करत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भद्रावती पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, आता शिवसेनेचे नेतृत्व सोडून धानोरकर यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, केवळ नगराध्यक्ष पदासाठीच धानोरकर यांनी कमळाचा स्वीकार केला आहे. वरोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली यांनी भाजपकडून निवडणूक लढली होती. मात्र, आता त्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा पंजा हाती घेतला आहे.
वरोरा काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गृह मतदारसंघ आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार करण देवतळे यांचीही कर्मभूमी आहे. त्यामुळे वरोऱ्यात जनमताचा कौल पक्षांतर करणाऱ्यांना मिळते की नाही हे बघणे महत्त्वाचे आहे. ब्रम्हपुरी नगरपालिकेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष रिता उराडे यांनी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची साथ सोडली आहे. त्यांनीही नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर काँग्रेसला रामराम केला आणि भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. भाजपवासी रिता उराडे यांना जनतेसमोर जाताना उत्तरे द्यावी लागणार आहे. सत्तेसाठी पक्षीय कोलांटउड्या घेणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत मतदारांसमोर जाताना चांगलाच कस लागणार आहे.
