नागपूर: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती भव्य बाजारपेठ नागपुरातील कळमन्यात आहे. जेव्हा या बाजारपेठेची निर्मिती झाली होती तेव्हा ती आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून तिचा लौकिक होता. विशेष म्हणजे येथे धान्याची पोती वाहणाऱ्या हमालांच्या नावाने एक वास्तू आहे. ‘हमाल भवन’ हे त्या वास्तूचे नाव. भांडवलशाहीच्या काळात श्रमिकांचे महत्व आता कमी झाले आहे, अशा काळात या भव्य बाजारात आजही ही वास्तू लक्ष वेधून घेते. या भवनाच्या उभारणीसाठी पुढाकार असणारे माथाडी कामगार नेते हरिष धुरट यांनी याबाबत समाजमाध्यमावर अलिकडेच एक पोस्ट केली आहे. ती सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरिष धुरट यांनी या हमाल भवनाच्या उभारणीची कथाच आपल्या पोस्टमधून सांगितली आहे. आजच्या पिढीला कदाचित ही माहिती नसेल. ते म्हणतात “चार साडेचार वर्षांनंतर कळमना मार्केटला जावं लागलं. या मार्केटच नाव प. जवाहरलाल नेहरू मार्केट. या आवारात त्रिभाषीय माथाडी कामगार, तीन रांज्यातील व संख्याही जवळपास तीन हजार तेवढीच.

हेही वाचा – नागपुरात ओबीसी संघटनांची बैठक, प्रकाश शेंडगे यांनी काय इशारा दिला

एक दिवस १५-२० हमाल कामगार माझ्या घरी आलेत. आपण आपल्या लोकांशी बोलावे असा आग्रह धरला. सर्वच बाजारातील प्रतिनिधी असतील तरच मी येईल अशी अट टाकून त्यांचे निमंत्रण स्वीकारले. काही वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. धान्य बाजार हरिहर मंदिर परिसरात, ग्रेन मार्केट इतवारीमध्ये, संत्रा वा फळ बाजार शनिचरामध्ये, भाजी बाजार म. फुले मार्केटमध्ये, मिरची बाजार सक्करदरा उमरेड रोडवर विखुरलेल्या ठिकाणी होता. शेतमाल दलाल, व्यापारी यांच्या मर्जीप्रमाणे हे सर्व चालायचे. सर्व प्रकारचा शेतमाल एकाच ठिकाणी विकला जावा, त्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी तत्कालीन कॉंग्रेस नेते बासाहेब केदार यांनी या मार्केटची उभारणी केली होती. आशिया खंडातील सर्वात सुंदर मार्केट असावे असे त्यांचं स्वप्न. त्यांनी या मार्केटला वैभव प्राप्त करून दिल होतं. अनेक संकटं, अनेक अडचणी, अनेक विरोधक सर्वांना झुगारुन मार्केट उभं केलं. द्वारकाप्रसाद काकांनी यांनी धुरा सांभाळली. नागपूर जिल्ह्यातील अनेकांची नावे घेण्यासारखी आहे. सर्वात जास्त मोडा घातला असेल तर फुल वाल्या संघटनेने!

आम्ही हमाल माथाडी कामगारांचे छान संघटन उभे केले होते. बाबासाहेब केदार म्हणाले होते, तुझं संघटन असेल तरच माथाडी कायदा लावतो. त्यांनी अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत माझी चौकशी केली होती. मला अनेकदा घरी बोलावून चर्चा केली. आपल्याला शेतकऱ्यांना न्याय देताना हमालांना संरक्षण द्यायचेच आहे, अशी हमी दिली. आम्ही छान संघटन उभ केले होते. उमेश चौबे यांनी फळ बाजारात हमाल संघटन चालविले होते. आम्हाला व्यापारी, दलाल, दारुगुत्तेवाले, काही गुंडांनी अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या. मागासांसाठी शिदोरी घर एका मंडपात उभे केले होते. तेसुद्धा जाळून टाकले होते. डॉ. रुपाताई कुळकर्णी यांनी मे महिन्याच्या उन्हात मदत केली होती. एका टग्गेवाल्या ठेकेदाराने माझ्या अंगावर गाडी चढविली होती. परिणाम माझा डावा हात एक इंचाने कमी झाला. असो ती केवळ आठवण! द्वारकाप्रसाद काकांनी यांनी दिलेल्या हमाल भवनात सभा झाली. पुन्हा नव्याने संघटन मजबूत करण्यासाठी कामगारांनी शपथ घेतली.

२०१३ ला मागणी मान्य

कृषी उत्पन्न बाजार समिती. पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट येथे हमाल भवनाची मागणी २००८ साली केली होती. मान्य झाली २०१३ साली. जागा कृषी उत्पन्न बाजार समितीची, हक्कही त्यांचाच. हमाल भवन बांधण्यासाठी तेव्हा पणन संचालनालयामार्फत एक लाख रुपये अनुदान मिळायचे. त्यात हमाल भवन बांधणे अशक्य. त्यातही मागणीचा तगादा पुणे येथे वांरवार करावा लागत. आजही करावा लागतो. आता अडीच लाख रुपये अनुदान मिळते. संघटनेचे बळ, बाजार समितीची मिळकत यावर अवलंबून असते. बाजार समितीचे संचालक व सभापती यांच्या सहमतीने हमाल भवन मिळाले.

हमाल भवन कशासाठी?

या भवन उभारणीमागे म. गांधीचा विचार आहे. ज्या ज्या व्यवस्थापनात किंवा उद्योगात कामगार असतो तो त्या त्या उद्योगाचा वा व्यवसायाचा विश्वस्त असला पाहिजे. जेणेकरून त्या कामगाराला हा उद्योग आपलाच आहे असे वाटले पाहिजे, असे गांधी म्हणत. याच उद्देशाने हमाल भवन उभे केले.

हेही वाचा – लष्कर छावणीतील जवान ऑटोरिक्षाने कन्हान नदी पुलावरून जात होते, समोरून ट्रॅव्हल्स आली अन्…

उद्देश..

बाह्य रुग्णालय चालविणे, हमालांचे प्रबोधन करणे, व्यावसायिक प्रशिक्षण देणे, बालसंगोपन करणे, सामाजिक आर्थिक व शैक्षणिक यात होईल तेवढी मदत करणे, सहकार्य करणे. हंगामावर काम जास्त हमाल कमी. हंगाम संपला तर हाताला कामच नाही. बेडकाचे जीवन न जगता माणसाचे जीवन जगण्याचा मार्ग शोधने. हमाल व्यापारी अडते शेतकरी यांची सांगड घालणे. व्यापारी अडते व शेतकरी यांचा हमाल शत्रू नाही तर तो मित्र आहे अशी सद्भावना निर्माण करणे. हा हे भवन उभारणीचा उद्देश होता.

‘जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है.’ अशा घोषणा आता बदलाव्या लागतील. असे दिसते. खरं तर संघटन मोडकळीस आलेले आहे.
यात संघर्ष करण्याची तयारी संत्रा बाजार, मिरची बाजार, धान्य बाजार, भाजी बाजार, बटाटा कांदा बाजार, ग्रेन मार्केट आदी ठिकाणच्या माथाडी कामगारांनी होकार दिला आहे. लढू या. वादळाने घर तुटलं तर पुन्हा नव्याने उभे करण्याची हमी कामगारांनी दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur asia largest agricultural commodity market has a hall of labourer what is history cwb 76 ssb