नागपूर : जिजाऊ बँकेच्या खामगाव शाखेतून १०० कोटींचे कर्ज मिळवून देतो, असे सांगत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील बोंडे आणि माधव पांढरे पाटील या दोघांनी साडेतीन कोटींची फसवणूक केल्याची तक्रार देणारे व्यवसायिक अतुल झोटिंग यांच्या अर्जावर सीताबर्डी पोलिसांनी ३ महिन्यांपासून गुन्हा दाखल केलेला नाही. पण, हे प्रकरण ठाण्याबाहेर मिटवण्यासाठी आटापिटा केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे यामागचा खरा सूत्रधार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

साडेतीन कोटींच्या रकमेची विचारणा केली की सुनील बोंडे आणि माधव पाटील आत्महत्येची धमकी देतात, असा स्पष्ट उल्लेख झोटिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तरीही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. शिवाय हे प्रकरण पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठांना माहीत आहे. त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करून घेत या फसवणुकीत बोंडेंची भूमिका काय, याचा छडा पोलीस लावू शकतात. मात्र झोटिंग यांच्या तक्रारीवर तीन महिन्यांपासून गुन्हाच दाखल झालेला नाही. पण, ठाण्याबाहेर तडजोड करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कळते. त्यामुळे यात नेमका कोणाचा फायदा आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खोटे नेमके कोण बोलतेय?

फसवणुकीच्या तक्रारीसंदर्भात भूमिका जाणून घेण्यासाठी झोटिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा व्यक्तिगत व्यवहार आहे. सुनील बोंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, झोटिंग यांच्यासोबत तडजोड झाली असून लवकरच व्यवहार पूर्ण होईल. मात्र या तडजोडीची माहिती पोलिसांकडे नसल्याचे सीताबर्डीचे ठाणेदार राजपूत यांनी सांगितले. त्यामुळे नेमके खोटे कोण बोलत आहे, यावरूनही संशय वाढत चालला आहे.

युनियन बँक अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद

झोटिंग यांच्या फसवणुकीची सुरुवात २५ डिसेंबर २०२३ला झाली. युनियन बँकेचे अधिकारी आशीष गोंडाणे यांनी त्यासाठी मध्यस्थी केली. गोंडाणे यांनीच झोटिंग यांची बोंडेंशी ओळख करून दिली. त्यावर बोंडे यांनी २९ जानेवारी २०२४ ला जिजाऊ बँकेतून १०० कोटींचे कर्ज मिळवून देतो, अशी हमी झोटिंग यांना दिली. यातूनच झोटिंग यांचा बोंडे आणि पाटील यांच्याशी साडेतीन कोटींचा व्यवहार झाला. या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या गोंडाणे यांच्या भूमिकेवरही संशय वाढत आहे. राष्ट्रीयकृत बँकेचा जबाबदार अधिकारी एखाद्या दुसऱ्या बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी अशी मध्यस्थी करण्याचे कारण काय, याचीही आता चौकशी होणे गरजेचे झाले आहे.

तक्रारदाराने संबंधितांना पैसे देताना करार केला होता का, याची माहिती घेतली जाईल. ही फसवणूक फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यातील असेल तर तातडीने चौकशीकरून गुन्हा दाखल व्हायला हवा होता. तक्रारदाराने या संदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधला होता का याचीही माहिती घेतली जाईल. संबंधित ठाणेदारांकडून सविस्तर स्पष्टीकरण मागितले जाईल. – नवीनचंद्र रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त.

काही बँक व्यवहारांमुळे माधव पाटील यांच्याशी ओळख होती. त्यातूनच पाटील यांच्यामार्फत बोंडे आणि झोटिंग यांची भेट घडवून आणली होती. या दोघांत झालेल्या आर्थिक व्यवहाराशी माझे काहीही देणेघेणे नाही. – आशीष गोंडाणे, शाखा व्यवस्थापक, युनियन बँक, उमरेड.