नागपूर : १८ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपूरातील सिव्हिल लाइन परिसरातील आकाशवाणी चौक ते माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर सुरु असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामामुळे झालेल्या अपघातात शिवबहादुर सिंह ठाकूर यांचा मृत्यू झाला. या घटनेस सिमेट रस्ता कारणीभूत ठरला, असा उल्लेख पोलीस पंचनाम्यात आहे, पण घटनेनंतर आठ महिने उलटूनही दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही, यामुळे मृतकाच्या कुटुंबियांमध्ये संतापाची भावना आहे.
सदर सिमेंट रस्त्याचे काम एसीइपीएल लि. या कंपनीमार्फत सुरू असून, कंपनीचे संचालक अभिषेक विजयवर्गीय यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागपूरच्या दोन आमदारांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडे केली होती. मात्र, अद्याप पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
अपघाताच्या दिवशी रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक बंद करून दोन्ही बाजूची वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली होती. यामुळे संभ्रम निर्माण होऊन अपघात घडल्याचा उल्लेख पोलीस पंचनाम्यात आहे. रस्त्यावर कोणतेही सुरक्षा कठडे, सूचना फलक न लावता काम सुरू होते. नागपूर एक्शन ग्रुपचे अध्यक्ष ठाकूर विश्वजीत सिंह यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अपघातानंतरही कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. संबंधित कंत्राटदार कंपनीवर कारवाई करून ती काळ्या यादीत टाकावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब पुढे आली आहे की, नागपूर शहरातील सुमारे ८० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नाहीत. त्यामुळे अपघाताचे ठोस पुरावे उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. मृतकाच्या मुलाने प्रशासनाकडे रोष व्यक्त करताना सांगीतले की, “एखाद्या सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाला, तर सत्ताधारी आणि पोलीस प्रशासन दोघंही गप्प राहतात. माझ्या वडीलांचा मृत्यू झाला, त्यानंतर आमदारांनीसुद्धा पत्र लिहिले, पण कुठलीही कार्यवाही झाली नाही. एकही आरोपी नाही, एकही अटक नाही. पोलीसांनी तपास बंद केला आहे.”
सदर प्रकरणात प्रशासन आणि पोलीस विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित कंपनी व तिच्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जनतेकडून होत आहे. तसेच, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेची सखोल तपासणी करावी, अशी मागणी केली.