अमरावती : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत असून त्यांचे गृहनगर असलेल्या अमरावतीत बुधवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आय लव्ह आंबेडकर’चे फलक हाती घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ही मोहीम देशव्यापी करण्याचा निर्धार यावेळी युवक काँग्रेसने व्यक्त केला. सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणे हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे, तर लोकशाही मूल्ये आणि सामाजिक न्यायावर केलेला हल्ला आहे, असा आरोप युवक काँग्रेसने यावेळी केला.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर एका वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेंगे’ या घोषणेखाली अत्यंत निंदनीय पद्धतीने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे देशातील कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक ऐक्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे मत युवक काँग्रेसने व्यक्त केले. हा प्रकार लोकशाहीच्या सर्वोच्च स्तंभाचा अपमान करणारा असून, सामाजिक समतेच्या तत्त्वांना धक्का देणारा असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.या घटनेमागे केंद्र सरकारमधील भाजप आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या बहुजनविरोधी आणि मनुवादी धोरणांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्ती कारणीभूत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.
‘आय लव्ह आंबेडकर’ मोहीम देशव्यापी
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, युवक काँग्रेसने आता संपूर्ण देशात ‘आय लव्ह आंबेडकर’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेद्वारे सामाजिक न्याय आणि समतेच्या तत्त्वांना अधिक बळकटी देण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ‘आय लव्ह आंबेडकर’ असा उल्लेख असलेले फलक हाती घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा सखोल तपास करून दोषींना कडक शिक्षा व्हावी. केंद्र आणि राज्य सरकारने सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत. बहुजनविरोधी धोरणे आणि मनुवादी विचारसरणीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या स्वायत्ततेचा आणि सन्मानाचा आदर राखला जावा, अशा मागण्या युवक काँग्रेसने केल्या आहेत.या निदर्शनांमध्ये अमरावती युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन आपला रोष व्यक्त केला. आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश गुहे, नितीन काळे, संकेत कुलट यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.