नागपूर : जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर वाचनाशिवाय पर्याय नाही, हा मूलमंत्रच त्यांनी आपल्या अनुयायांना दिला. बाबासाहेबाबाच्या विचारांनी भारावलेल्या त्यांच्या अनुयायांना हा मंत्र आजही महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच दीक्षाभूमीवर अनेक प्रकारचे जिन्नस विक्रीला असतांना सर्वाधिक मागणी पुस्तकांचीच असल्याचे दिसते. दीक्षाभूमीवरील एका अंदाजानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन पर्वाच्या काळात पुस्तकांवर जवळपास ५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. २ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दक्षिण भारतातील राज्य कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू यासह उत्तर भारतातील राज्यातील अनुयायी मोठ्या संख्येत आले.

दीक्षाभूमीवर देशभरातून येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढतच जात आहे. महाराष्ट्रवगळता देशातील इतर प्रदेशात अनुयायांना बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारधन असलेले साहित्य सहज मिळत नाही. त्यामुळे नागपूरची दीक्षाभूमी आणि मुंबईच्या चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांचा ओढा पुस्तकांकडे अधिक असतो. दीक्षाभूमीवर आलो की, एखादेतरी पुस्तक घेऊन जावे, अशी येथे येणाऱ्या प्रत्येकाची मुख्य इच्छा असते. त्यामुळे पुस्तकांच्या कोणत्याही स्टॉलवर गेले, की लोकांची गर्दी पाहायला मिळते.

दीक्षाभूमी परिसर आणि सभोवतालच्या परिसरात पुस्तक विक्रेत्यांचे तीनशेच्या वर स्टॉल होते. भारताचे संविधान, बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथांना सर्वाधिक मागणी होती. याशिवाय बाबासाहेब लिखित मूळ ग्रंथाची मागणी देखील मोठ्या प्रमाणात होती. लहान मुलांना महापुरुषांची ओळख करून देण्यासाठी कॉमिक्स स्वरूपातही पुस्तक उपलब्ध होत्या.

सोहळ्याची क्षणचित्रे

  • दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळ्यापूर्वी जपानमधील भिक्खु संघाने जपानच्या पारंपारिक पद्धतीने बुद्ध वंदना केली. मूळत: जपानचे असलेल्या भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनीही यात सहभाग घेतला.
  • बाबासाहेबांनी सकाळी ९ वाजता दीक्षा घेतली होती. त्यामुळे त्याच वेळी त्रिशरण आणि पंचशीलाचे पठण करण्याच आले. यावेळी समता सैनिक दल तसेच निवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी पथसंचलन केले.
  • यंदा मूळत: बाबासाहेब लिखित इंग्रजी तसेच अनुवादित पुस्तकांचा अधिक मागणी होती. ‘एआय’ द्वारा तयार बाबासाहेबांची चित्रेही विशेष लक्षवेधी ठरली.
  • दीक्षाभूमीवर परराज्यातील अनुयायांची संख्या अधिकची होती. मात्र पोलीस प्रशासनाकडून हरविलेल्या लोकांची माहिती मराठीत दिली जात असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. यावर उपाय म्हणून हरविलेल्या व्यक्तींनाच त्यांच्या भाषेत घोषणा करण्याची संधी देण्यात आली.
  • दीक्षाभूमी परिसरात अनेक तरुण संघटनांकडून परदेशात उच्च शिक्षण तसेच कायदेशीर मदत याबाबत जनजागृतीपर नाट्य सादर करण्यात आले. यासाठी बाबासाहेबांवर आधारित प्रसिद्ध गीतांचा आधार घेतला गेला.
  • दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना माहिती देण्यासाठी जागोजागी इलेक्ट्रिक स्क्रीन लावण्यात आले. यंदा ‘क्युआर’ कोडचाही वापर महापालिकेने केला. महापालिकेने समाज माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात उपलब्ध सुविधांची माहिती प्रदान केली.
  • पोलीस प्रशासनाने यंदा १०० एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरांच्या सहाय्याने गर्दीवर लक्ष ठेवले. गर्दीमध्ये गुंडेगारी स्वरुपाचे व्यक्तींना शोधण्यासाठी पोलिसांनी या तंत्रज्ञानाची मदत घेतली.