नागपूर : मार्च महिन्यात महाल परिसरात घडलेली दंगल ही मुस्लीम समाजकंटकांकडून पूर्वनियोजित होती. कबरीची प्रतिकृती आणि हिरव्या कापडाची जाळपोळ हे केवळ एक क्षणिक निमित्त होते. मुस्लीम समाजात पसरवण्यात आलेल्या गैरसमजामुळे हा प्रकार घडला आहे. हिंदू समाजाला लक्ष्य करण्यासाठी ही दंगल घडवण्यात आली होती, असा आरोप भारतीय विचार मंचच्या तथ्य संशोधन समितीच्या अहवालात करण्यात आला आहे.

मंगळवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय विचार मंचने अहवालासंदर्भात माहिती दिली. समितीचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार चारुदत्त कहू म्हणाले, देशात मागील काही काळात घडलेल्या घटनाक्रमानंतर मुस्लीम समाजात पसरवण्यात आलेल्या गैरसमजांनी मोठ्या प्रमाणात या घटनेला हातभार लावल्याचे समितीला आढळून आले. मुस्लीम दुकानदारांकडून एरवी पथपदावर असणारी दुचाकी वाहने दंगलीच्या दिवशी दुपारपासूनच हटवण्यात आली होती.

दंगलखोर जमाव मोठे दगड, लाठ्या-काठ्या, काचेच्या बाटल्या, तलवारी, चाकू, पेट्रोल बॉम्ब बाळगून होता. त्यातून ही दंगल नियोजित होती, हे स्पष्ट होते. हिंदू समाजाला लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न होता, असा दावा कहूंनी केला. पोलीस आयुक्त निकेतन कदम कुऱ्हाडीच्या हल्ल्यात जबर जखमी झाल्याचाही उल्लेख या अहवालात आहे. पत्रकार परिषदेला सुनील किटकरू, रमाकांत दाणी, ॲड. रितू घाटे उपस्थित होते.

अहवाल न्यायालय, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात

या दंगलीचा आरोपी फहीम खान याच्या घरावर झालेली कारवाई चूक असल्याचा आक्षेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतला होता. मात्र, तथ्यशोधन समितीने ही कारवाई योग्य ठरवली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही तथ्यशोधन समितीने एका महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आल्याचे व हा प्रकार केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून, तो संपूर्ण सुरक्षा यंत्रणेच्या मनोबलावर केलेला क्रूर आघात आहे, असे निष्कर्ष आपल्या अहवालात मांडले आहेत.

दंगल हाताळण्यात पोलिसांची काहीशी चूक

पोलिसांना मुस्लीम समाजाच्या संवेदनशील वस्त्यांमधील घडामोडींची पुरेशी कल्पना आली नाही, असे म्हणायला देखील वाव आहे. पोलिसांना दंगल हाताळण्यात संपूर्ण सज्जता बाळगता आली नाही, असेही म्हणता येईल. परिस्थितीचा नेमका अंदाज घेण्यात पोलीस यंत्रणेच्या गुप्तहेर विभागाला पुरेसे यश आले नाही, असा निष्कर्ष समितीने काढला.

समितीच्या शिफारशी

ही घटना पोलीस यंत्रणेसाठी मोठा धडा आहे.

संवेदनशील वस्त्या, मार्गावर सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा आवश्यक आहे.

दंगलीत अनेक घरे, दुकाने, वाहने तसेच दवाखान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटकांना शासनाने तात्काळ पुरेशी नुकसान भरपाई द्यावी.

या वस्त्यांमध्ये सुरक्षिततेबाबत लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.

दंगलीत झालेले नुकसान दंगलखोरांकडून वसूल करण्याची प्रभावी व्यवस्था आणि योजना हवी.

मुस्लीम समुदायात मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची गरज आहे.