नागपूर: उपराजधानी नागपुरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एम. टेक. पदवीधराला धंतोली पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. पदवीधर चोराने मोठ्या बंगल्यांना लक्ष करत अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या. तशी कबुली त्याने दिली. त्याची पदवीधर ते चोरी करण्यापर्यंतचा प्रवास धक्कादायक आहे.

एम. टेक. पदवी घेतल्यानंतर या तरुणाने आय. टी. कंपनीत नोकरी केली. त्यादरम्यान जुगारात २३ लाख गमावल्यावर तो चोरी करू लागला. आशिष रेडिमल्लाने असे चोरीच्या घटनेत अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर तरुणाने एम. टेक. असे उच्च शिक्षण घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी आशिष रेडिमल्लाने एम. टेकचे शिक्षण घेतल्यावर पुणे आणि नागपूरच्या नावाजलेल्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरी केली. नोकरी दरम्यान त्याची अनेक व्यक्तींसोबत मैत्री झाली. त्यात बरेच व्यक्ती वाईट मार्गावरील होते. दरम्यान वाईच मित्रांच्या संगतीमुळे त्याला जुगाराचे व्यसन लागले. हळू- हळू तो स्वत:च्या वेतनासह जमा केलेली पुंजीही जुगारात हरू लागला.

जुगाराच्या व्यसनामुळे त्याचे आयुष्य गुन्हेगारीच्या मार्गावर गेले. दरम्यान नागपुरातील धंतोली परिसरात राहणाऱ्या शीतल चिंतलवारच्या घरात चोरी झाली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा स्केच तयार केले. प्राप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर जिल्ह्यातील आशिष रेडिमल्लाला पकडण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीला पोलिसांनी आपला हिसका दाखवल्यावर त्याने नागपूरच्या इतर पोलिस ठाण्यांच्या परिसरातही चोरी केल्याची कबुली दिली आहे.

प्रकरण काय ?

पोलिस तपासात असे निष्पन्न आले की आशिषने जुगारात २३ लाख रुपये गमावले होते. कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला. तो स्वतः नोकरीच्या काळात नागपूरच्या छत्रपती नगर भागात राहत होता, त्यामुळे त्याला तेथील घरांची पूर्व माहिती होती. त्याने ओसाड बंगल्यांची रेकी करायला सुरुवात केली आणि आतापर्यंत पाच घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे.

चोरीसाठी चंद्रपूरहून बसने नागपूर प्रवास

पोलीस तपासात आरोपी चोरी करण्यासाठी चंद्रपूरहून बसने नागपूरला येत असल्याचे दिसून आले आहे. तो चोरीसाठी रिकाम्या घरांवर खूण करत असे आणि नंतर गुन्हा करत असे. आरोपीला अटक केल्यानंतर धंतोली पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनामिक मिर्झापुरे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.