नागपूर : शहरातल्या विविध मद्यालयांना लागणाऱ्या मद्याचा पुरवठा करताना सीलबंद बाटल्यांमधून चोरलेल्या दारूत भेसळ करून त्याची विक्री करणाऱ्या सात जणांच्या टोळीला कळमना पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून १३५ लिटर मद्याच्या साठ्यासह चार वाहने असा ३० लाखांचा एवज पोलिसांनी जप्त केला आहे.

शहरातल्या अनेक मद्यालयांमध्ये दारू पुरवणारी ही टोळी मद्यात पाण्याची भेसळ करून चोरलेली दारू विकत असल्याचेही आढळले आहे. त्यामुळे शहरातल्या १०० हून अधिक मद्यालयांमध्ये ग्राहकांची फसवणूक करत त्यांच्या पेल्यात भेसळयुक्त दारू पुरवली जात असल्याचाही पोलिसांना संशय आहे.

महेंद्र रामभाऊ बांगल (४३), रा. गुलशननगर, निखील उर्फ निक्कू राजू नाटकर (२८), रा. ओमसाई नगर, नारायण उर्फ बंटी बंडूजी मोथरकर (३५), इब्राहिम बब्बू खान पठाण (४०), रोशन राकेश साहू (३४), गजेंद्र तेजिराम साहू (३६) आणि मणीराम उर्फ राहूल कालेश्वर पासवान (२५) अशी कळमना पोलिसांनी अटक केलेल्या मद्यचोर टोळीतल्या सदस्यांची नावे आहेत.

यातला इब्राहिम बब्बू खान हा या टोळीचा मास्टरमाईंड आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो शहरातल्या मद्यालयांना लागणाऱ्या दारूचा पुरवठा करण्याचे काम करतो. श्रीराम ट्रेडर्ससाठी काम करणारा इब्राहिम गोडाऊनमधून दारूची खेप घेऊन निघाल्यानंतर गाडी दूर कुठेतरी थांबवायचा.

त्यानंतर पद्धतशीरपणे पेट्या उघडून त्यातल्या मद्याची ते परस्पर अदलाबदली करत काही मद्य काढून घेत होता. त्या बदल्यात तो मद्यामध्ये पाणी मिसळून तो साठा मद्यालयाला पुरवत होता. याचा सुगावा लागल्यानंतर कळमना ठाण्याच्या पथकाने महेंद्र बांबल याची बोलेरो थांबवून तपासणी पोलिसांनी त्यानंतर एकेक कडी जोडत सातही जणांना अटक केली. या टोळीने गेल्या तीन वर्षांत सीलबंद दारूच्या बाटल्यांमधून चोरलेले कोट्यवधी रुपयांचे भेसळयुक्त मद्य पुरवल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने तपास केला जात आहे.

कबाडीच्या दुकानातून विकत घ्यायचे बाटल्या

आरोपी भंगार दुकानातून रिकाम्या बाटल्या विकत घ्यायचे. ते खऱ्या बाटल्यांतील दारू त्या बाटल्यांत जमा करायचे. त्या बाटल्यांतील दारू ते खऱ्या असल्याची भासवून विकायचे.