लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : मागील तीन निवडणुकांमध्ये आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या काही लाखांनी वाढायची. यावेळी मात्र २०१९ च्या तुलनेत मतदारसंख्या केवळ २० हजाराने वाढल्याचे दिसून येत आहे. यातून अटीतटीच्या लढतीचे संकेत मिळत आहेत.

दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदार संख्येसोबतच प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ व्हायची. २०१४, २०१९, २०२४ च्या निवडणुकीतही हेच चित्र होते. मात्र २०२४ मध्ये ही संख्या आधीच्या दोन निवडणुकांपेक्षा अत्यल्प आहे. २०१४ मध्ये १०,८५,०५८ मतदारांनी मतदान केले होते. ही संख्या त्यापूर्वीच्या म्हणजे २००९ च्या (७,५५,३६९) तुलनेत ३ लाख ३० हजार मतांनी अधिक होती.

आणखी वाचा-फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”

२०१९ च्या निवडणुकीत ११,८७,२१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता व ही संख्या २०१४ च्या तुलनेत सरासरी एक लाखाने अधिक होती. २०२४ मध्ये १२,०७३४४ मतदारांनी मतदान केले. ते २०१९ च्या तुलनेत केवळ २० हजारांनी अधिक आहे. मतदारांच्या संख्येतील ही अत्यल्प वाढ लढतीतील प्रमुख पक्ष अनुक्रमे भाजप व काँग्रेसची चिंता वाढवणारी ठरू शकते.

नागपूरमध्ये २०२४ च्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. २२ लाख २३ हजार २८१ मतदारांपैकी १२ लाख ७३४४ (५६.४७ टक्के) मतदारांनी मतदान केले. भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यात लढत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur lok sabha small increase in voter turnout what does it signal cwb 76 mrj