नागपूर : काही वेळा पूर्वी जग पाहिलेल्या एका नवजात चुमुरडीला जन्माच्या अवघ्या काही मिनिटांतच उलट्या काळजाच्या मातेने बुधवारी कचऱ्याचा ढिग दाखवल्याने उच्चभ्रूंची वस्ती असलेला धंतोली परिसर शहारला. गजानन नगर परिसरातल्या डंपिंग यार्डमध्ये ही घटना उघडकीस आली.

नऊ महिने गर्भात वाढविलेल्या जीवाला एका मातेने जन्माच्या अवघ्या काही तासांतच उकिरड्यावर फेकत मातृत्वाचाच अपमान केला. . पण त्याच क्षणी रक्ताचे कसलेही नाते नसताना कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून हृदयाशी कवटाळत एक मोलकरणीने चिमुकलीला काळजाशी कवटाळत रक्ताच्या नात्यापलिकडचे मातृत्त्व देखील दाखवून दिले. निसर्गाने जन्म देण्याचे दान पदरात टाकलेल्या एका स्त्रीची ही दोन विभिन्न रुपे पाहून अनेकांच्या कडा बुधवारी अलगद पाणावल्या.

उकीरड्यावर बेवारस अवस्थेत सापडलेल्या या चिमुकल्या मुलीला तडक उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी करीत मुलगी पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले. घरकाम करणारी एक स्थानिक महिला नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कामावर निघाली होती. तोच गजानन नगर परिसरातून जाताना जीवाच्या आकांताने रडणाऱ्या एका बाळाचा टाहो तिच्या कानी पडला. उकीरड्याच्या दिशेने कानावर अदळत असलेल्या या चिमुकल्याचे रडणे एकून या मोलकरणीचे काळीज द्रवले. त्यावेळी तिची नजर एका पॉलिथीनजवळ स्थिरावली. जिथे एक नवजात बाळ कपड्यांशिवाय उघडे- नागडे बेवारस अवस्थेत पडले होते.

महिलेने मागचा पुढचा कसलाही विचार न करता मुलीला उचलत हृदयाशी कवटाळले. पावसामुळे वातावरणात गारवा असताना चिमुकल्याशी रक्ताचे कसलेही नाते नसताना या महिलेने बाळाला कपड्यात गुंडाळले. त्याला पदराची ऊब देत धंतोली पोलिसांना माहिती दिली.

पोलिस घेताहेत मातेचा सिसिटिव्ही माग

घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी तातडीने धाव घेतली. मोलकरणीच्या मदतीने महिला पोलिस शिपाई पौर्णिमा यांनी मुलीला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक तपासणी दरम्यान डॉक्टरांनी मूलगी पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट करीत अवघ्या काही मिनिटांपूर्वीच तिचा जन्म झाल्याचे सांगितले. हे नवजात मूल उकिरड्यावर सोडणारी उलट्या काळजाची माता कोण हे शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, पोलिसांनी पुढील तपासासाठी गुन्हा दाखल केला आहे.