मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर आता लवकरच भंडारा शहरदेखील ‘मेट्रो सिटी’ म्हणून ओळखले जाणार आहे. भंडारा रोड ते भंडारा शहरपर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली.
यासंदर्भात ‘महारेल’मार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीत भंडारा रोड ते भंडारा शहरापर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आदी उपस्थित होते.
हेही वाचा- वाईट उद्देशाने लोकप्रतिनिधी कामे बंद पाडतात – मिनकॉन परिषदेत गडकरींनी सुनावले
नागपूर ते भंडारा रोड मेट्रो सेवेचा विस्तार
महारेल व्यवस्थापकीय संचालकांनी भंडारा मार्गापासून भंडारा शहरादरम्यान ११ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गिकेवर नवी ‘ब्रॉड गेज मैट्रो लाईन’ प्रकल्पाचा व्यवहार्ता अभ्यास अहवाल सादर केला. नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर शहर व परिसरातील भारतीय रेल्वेच्या मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या पॅसेंजर ट्रेन्सऐवजी रेल्वे आधारित आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित बी. जी. मेट्रो ट्रेन्स सुरू करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प नागपूर ते भंडारा रोड या भारतीय रेल्वे मार्गिकेवर राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ११ स्थानके असून त्याची लांबी ६२.७ किमी आहे. भंडारा रोड ते भंडारा शहर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल महारेलने सादर केला आहे.
हेही वाचा- राजकीय नेत्यांचा महापालिकेच्या पथकावर दबाव ; नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईत अडथळे
विदर्भात मेट्रो विस्तार
नागपूर येथील मेट्रो सेवा ही शहरापुरतीच मर्यादीत राहू नये, याचा विस्तार शेजारी असलेल्या जिल्ह्यांपर्यंत व्हावा, अशी योजना तयार करण्यात येत असल्याचे सुतोवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकवेळा आपल्या भाषणात केले होते. भंडारा, गडचिरोली, वर्धा, गोंदियापर्यंत नागपूर मेट्रो सेवेचा विस्तार करण्यासाठी रेल्वे विचार करत असल्याचेही अनेकवेळा गडकरींनी सांगितले होते.