नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१७ मधील निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. मात्र, त्यानंतर ओबीसी आरक्षणासह विविध याचिका न्यायप्रविष्ट झाल्याने साडेतीन वर्षांपासून नागपूर महापालिकेत निवडणुका होऊ शकल्या नाहीत. परिणामी महापालिकेत सध्या प्रशासक राज सुरू आहे.

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने बूथपासून प्रभाग पातळीपर्यंत संघटनात्मक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नागपूर शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी याची सुरुवात पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून केली. त्यांनी मंडळ‌ अध्यक्ष, महामंत्री, बूथ अध्यक्ष, शक्ति केंद्र प्रमुख तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

पूर्वी सहा मंडळ होते, आता प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ३ ते ४ मंडळ तयार करून एकूण २० मंडळांचे नियोजन करण्यात आले आहे. झिंगाबाई टाकळी मंडलमध्ये ९ वार्ड आणि १०६ बूथ आहेत. तिवारी यांनी येथे प्रमुख कार्यकर्त्यांकडून नागरिकांच्या अडचणी, शासकीय योजना पोहोचत आहेत का, कार्यकर्त्यांचा सहभाग अशा विविध मुद्द्यांवर माहिती घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बूथ मजबूत करण्यासाठी माइक्रो सुरू केली असून, पुढील २० दिवस सर्व मंडळांतील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन दशकांपासून नागपुरात भाजपचे वर्चस्व टिकून आहे. संघटनात्मक ताकद, बूथस्तरावरील नियोजन, तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी असलेला दृढ संपर्क यामुळे भाजपने शहरात आपली मुळे अधिक घट्ट रोवली आहेत. विशेषतः गेल्या तीन वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर असल्याने पक्षाला मोठे बळ लाभले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने यंदाही विजयासाठी माइक्रो प्लॅनिंग सुरू केली आहे.

दुसरीकडे, काँग्रेस पक्ष मात्र गटबाजी, नेतृत्वाचा अभाव आणि अंतर्गत मतभेदांमुळे मागे पडलेला दिसतो. नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात काँग्रेसला भक्कम पर्याय उभा करण्यात अपयश आले आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी २० मंडळांमध्ये बूथ ते प्रभागस्तरावरील आढावा बैठका सुरू केल्या असून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे. भाजपकडून नागरिकांच्या समस्या, योजना आणि विकासकामांचा आढावा घेत आगामी निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जात आहे.

२०१७ च्या नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे बळ असे होते. भाजपने १५१ सदस्यांच्या महापालिकेत १०८ जागा जिंकल्या, म्हणजे बहुसंख्य जागांवर त्यांना मोठी विजय मिळाला. काँग्रेसला फक्त २९ जागा मिळाल्या, बीएसपीच्या १० जागा, शिवसेना -२ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – १ जागा आणि एक स्वतंत्र उमेदवार देखील निवडून आला.